चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान) 
    संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे स्थानिक स्व. मदनगोपाल मुंधडा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजीत आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल क्रिडा स्पर्धेमध्ये चांदूर रेल्वे ‘झोन बी’ मधून अंतिम सामन्यात चांदूर बाजार येथील टोम्पे कॉलेजने बाजी मारली आहे.
    ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान आयोजित या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी उपविभागीय पोलिस अधिकारी अविनाश शिंगटे यांच्या शुभहस्ते व प्राचार्य डॉ. जयंत कारमोरे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाले होते. अमरावती, चांदूर रेल्वे, अासेगाव पूर्णा, शेंदुर्जना घाट, चांदूर बाजार, मोर्शी, नांदगाव पेठ, पिंपळखुटा, वरुड, नेरपिंगळाई, कुऱ्हा, बडनेरा, तिवसा, भातकुली, धारणी, जरुड,  वलगाव आदी गावा – शहरातील महाविद्यालयातील टिम सहभागी झाल्या होत्या. यामधून उपांत्य सामन्यामध्ये प्रथम सामना श्रीराम कॉलेज कुऱ्हा विरूध्द केशरबाई लाहोटी महाविद्यालय अमरावती यांच्यात झाला. यामध्ये केशरबाई लाहोटी महाविद्यालयाची चमु विजयी झाली तर दुसरी लढत टोम्पे कॉलेज चांदूर बाजार विरूध्द डीसीपीई एचव्हीपीएम कॉलेज अमरावती यांच्यात झाली. यामध्ये टोम्पे कॉलेज चांदूर बाजार विजयी झाली. यानंतर केशरबाई लाहोटी कॉलेज व टोम्पे कॉलेज यांच्यात झोनमधील अंतिम सामना झाला. यामध्ये टोम्पे कॉलेज, चांदूर बाजार ने दणदणीत विजय संपादित करून ‘चांदूर रेल्वे बी झोन’ मधून आपले वर्चस्व सिध्द केले. यानंतर आता चार झोनमधून चार विजयी संघाचे उपांत्य व अंतिम सामना होणार असुन त्यानंतर विद्यापीठातुन विजयी संघ ठरणार आहे. सदर स्पर्धांकरीता प्राचार्य डॉ. जे. डी. कारमोरे यांच्यासह शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालिका आणि क्रीडा स्पर्धेच्या आयोजिका प्रा. डॉ. अलका करनवाल यांसह प्राध्यापक, कर्मचारी वृंद, विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. सदर व्हॉलीबॉल स्पर्धांचे परीक्षण महाराष्ट्र व्हॉलीबॉल रेफरी बोर्डचे सदस्य संजय बढे आणि डॉ. संजय देशमुख यांनी केले.
१४ ऑक्टोबरला चारही झोनमधील विजयी संघांचा अंतिम सामना
       अमरावती विद्यापीठातर्फे आयोजित आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत अकोला, चांदूर रेल्वे, बुलढाणा आणि यवतमाळ या चार प्रमुख विभागांमध्ये आयोजित केली असुन चारही विभागांमधून विजय ठरणाऱ्या चारही संघांचा उपांत्य सामना आणि त्यातून विजय संघात अंतिम सामना १४ ऑक्टोबरला मुंधडा महाविद्यालयातच होणार आहे. जिंकणाऱ्या संघास फिरता चषक विद्यापीठाकडून देण्यात येणार आहे. याशिवाय संपूर्ण विजय संघातून आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी चमूची निवड चाचणी ही मुंधडा महाविद्यालयातच १५ ते १७ ऑक्‍टोबर दरम्यान होणार आहे.