मला अटक करा, आणखी १ सहस्र खटले भरा, मला चकमकीत मारा; मात्र मी गोरक्षा करणारच !

0
596
Google search engine
Google search engine

भाजप आमदार टी. राजासिंह यांचे तेलंगण सरकारला आव्हान

 

भाग्यनगर – मला अटक करा, आणखी १ सहस्र खटले भरा, मला चकमकीत मारा, नाहीतर मला फाशी द्या. जेथे गोहत्या होतात, तेथे गोरक्षा करण्यासाठी आणि माझ्या धर्माची सेवा करण्यासाठी माझे जीवन आहे, त्यासाठी मरण आले तरी मला त्याची चिंता नाही, या शब्दांत भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी तेलंगण सरकारला आव्हान दिले आहे.

तेलंगण सरकारने नुकताच एक आदेश काढून टी. राजासिंह यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रशासनास अनुमती दिली आहे. या प्रकरणात टी. राजासिंह यांनी सप्टेंबर २०१३ मध्ये विशाल गोरक्षा गर्जना या कार्यक्रमाचे भाग्यनगर येथे आयोजन केले होते. त्या वेळी त्यांनी प्रक्षोभक भाषण केले असल्याचा आरोप करत पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. आमदारांवर कारवाई करण्यासाठी सरकारच्या अनुमतीची आवश्यकता असते. तेलंगणच्या कायदा विभागाने तसा आदेश काढला असून टी. राजासिंह यांच्या विरोधात कथित द्वेषपूर्ण भाषण करण्याच्या पार्श्‍वभूमीवर खटला चालवण्याची अनुमती दिली आहे.

त्यावर टी. राजासिंह यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले, मला प्रसारमाध्यमांपासून कळले आहे की, भाग्यनगरचे आयुक्त महेन्द्र रेड्डी यांनी तेलंगण सरकारला पत्र लिहिले आहे आणि सरकारने माझ्याविरुद्ध कारवाईसाठी आदेश काढला आहे. माझ्यावर आणखी एक खटला प्रविष्ट केला, तरी मला त्याची भीती वाटत नाही. तेलंगण सरकारला, आमच्या मुख्यमंत्र्यांना आणि पोलिसांना सांगतो की, मी राजकारणात राजकारण म्हणून प्रवेश केला नसून माझ्या धर्माची सेवा करण्यासाठी आणि गायींचे संरक्षण करण्यासाठी प्रवेश केला आहे. गोरक्षणामुळे काँग्रेसच्या काळात ५० हून अधिक गुन्हे नोंदवले गेले; परंतु मी गोरक्षा चालूच ठेवली आणि ठेवणार आहे, माझ्या शेवटच्या श्‍वासापर्यंत माझ्या हिंदु बांधवांची आणि माझ्या देशाची सेवा चालू ठेवणार आहे.