बलात्कार्‍यांना भर चौकात फासावर लटकवा ! – भोपाळमधील पीडित तरुणीची मागणी

0
881
Google search engine
Google search engine

भोपाळ – येथे ३१ ऑक्टोबरला १९ वर्षीय तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणी पीडितेने आरोपींना भर चौकात फाशी देण्याची मागणी केली आहे. तसेच तिने पोलिसांवरही टीका केली आहे. ‘मी माझ्या वडिलांसह पोलीस ठाण्यांच्या चकरा मारत होते; मात्र पोलिसांनी कोणतेही साहाय्य केले नाही. उलट या घटनेवरच प्रश्‍न उपस्थित केले.’

अतिरिक्त पोलीस उपमहासंचालक अनुराधा शंकर यांनी पीडितेच्या घरी जाऊन तिची भेट घेतली. जर तिने धाडस केले नसते, तर आरोपी पकडले गेले नसते. सरकारने या पीडितेला ३ लाख रुपये आर्थिक साहाय्य आणि तिचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी साहाय्य देण्याची घोषणा केली आहे.

या तरुणीचे ४ जणांनी अपहरण करून तिच्यावर ३ घंटे सलग सामूहिक बलात्कार केला होता. याविषयीची तक्रार स्थानिक पोलीस ठाणे, घटना घडली तेथील पोलीस ठाणे आणि रेल्वे पोलीस यांनी प्रविष्ट करून घेण्यास नकार दिला होता. तरुणीचे आईवडील पोलीस दलांत असतांना त्यांना हा अनुभव आला. यानंतर वरिष्ठ अधिकार्‍यांना सांगितल्यावर तक्रार प्रविष्ट करून आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकारणी ६ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.