शहरातील एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर राष्ट्रीयकृत बँकांचे दुर्लक्ष

0
623
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) 
ग्राहकांना पैसे काढण्याची अविरत सेवा मिळण्याबरोबरच बँकांच्या कामाचे ओझे कमी करण्यासाठी प्रत्येक बँकेने ठिकठिकाणी ‘एटीएम’ ची सोय केली आहे. या एटीएममध्ये लाखो रूपयांची रोकड ठेवली जाते. मात्र एटीएमच्या सुरक्षेसाठी शहरातील बँकांनी सुरक्षा रक्षकच नेमला नसल्याचे धक्कादायक वास्तव दिसून आले.
    चांदुर रेल्वे शहरात बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया या चार राष्ट्रीयकृत बँकांचे एटीएम आहे. बँकांच्या एटीएममध्ये लाखो रूपयांची रक्कम राहात असल्याने त्या रकमेच्या सुरक्षेसाठी बँकेने सुरक्षा रक्षक नेमून एटीएम व त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची सक्ती रिझर्व्ह बँकेने सर्वच बँकांना केली आहे. पैशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्वपूर्ण मानला जात असला तरी शहरातील राष्ट्रीयकृत बँका याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. बँकेत सीसीटीव्ही कॅमेरे असुन सुरक्षेचा खर्च वाचविण्यासाठी बँका सुरक्षा रक्षक नेमत नाही आहे. याचा गैरफायदा घेत चोरटे एटीएम फोडून रोकड लंपास करीत असल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. त्यानुसार ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ या म्हणीप्रमाणे सर्व बँकांनी एटीएमच्या सुरक्षेबाबत योग्य ती खबरदारी घेणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात शहरातील बँका याबाबत चांगल्याच बेफिकीर असल्याचे दिसून येते. यामुळे दिवसाढवळ्या एखाद्याला लुटण्याचा प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. चांदुर रेल्वे शहरातील स्टेट बँकेच्या एटीएमवर केवळ रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक नेमण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सेंट्रल बँकेच्या एटीएमवर पुर्वी सुरक्षा रक्षकांची नेमनुक करण्यात आली होती. मात्र आता या बँकेच्या एटीएमवरील सुरक्षा रक्षक दिसेनासे झाले आहे. तर महाराष्ट्र बँक व बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर अजुनही सुरक्षा रक्षकाची कधीही नेमनुक करण्यात आलेली नाही. अनेकांना एटीएमने पैसे काढणे जमत नाही. मात्र सुरक्षा रक्षक नसल्याने त्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
बँकेतही नाही सुरक्षा रक्षक
शहरातील स्टेट बँक वगळता इतर कोणत्याही बँकेत बंदुकधारी सुरक्षा रक्षकाची नेमनुक करण्यात आलेली नाही. बँकेत मोठ्या प्रमाणात रोकड जमा राहत असल्यामुळे बँकेने बंदुकधारी सुरक्षा रक्षक नेमने गरजेचे आहे. परंतु बँका याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.