… तरच हिंदु धर्माच्या विजयाची गुढी संपूर्ण विश्‍वात उभी करता येर्इल !

173
सनातन वैदिक हिंदु धर्मानुसार चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा नववर्षारंभदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सूर्योदयानंतर गुढी उभारून नवीन वर्षाचा मंगलमय प्रारंभ करण्याची प्रथा आहे. काही जात्यंध संघटना काही वर्षांपासून ‘गुढीपाडवा हा धर्मवीर संभाजी महाराजांची हत्या झाल्याच्या आनंदोत्सवाची परंपरा आहे’, असा जाणीवपूर्वक अपप्रचार करून लोकांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत. वास्तविक धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या कित्येक शतके आधीपासून गुढीपाडवा साजरा केला जात आहे. 
 
             साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणारा हा दिवस नववर्षारंभ असण्यामागे केवळ धार्मिक नाही, तर ऐतिहासिक आणि नैसर्गिक कारणेही आहेत. ती कारणे जाणून घेतली आणि कर्मकांड म्हणून नाही, तर शास्त्र जाणून घेऊन सण साजरा करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होईल. 
 
गुढीपाडव्याचे महत्त्व 
 गुढीपाडव्याच्या दिवशी प्रजापती लहरी पृथ्वीवर अधिक प्रमाणात येतात. या लहरींमुळे वनस्पती अंकुरण्याची भूमीची क्षमता वाढणे, बुद्धी प्रगल्भ होणे, विहिरींना नवीन पाझर फुटणे असे परिणाम होतात. ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंतसंपातावर म्हणजे जेथे कर्कवृत्त आणि विषुववृत्त परस्परांना छेदतात, त्या बिंदूवर येतो आणि वसंत ऋतु चालू होतो. या वेळी हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धक असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येते. ब्रह्मदेवाने संकल्पाने सृष्टीची निर्मिती केली, असे हिंदु धर्मात सांगितले आहे. ज्या दिवशी या सृष्टीची निर्मिती झाली, तो दिवस म्हणजे चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा. त्या अर्थाने केवळ हिंदु धर्मियांसाठी नाही, तर संपूर्ण मानवजातीसाठीचाच हा नववर्षारंभ आहे. याच दिवशी रामाने वालीचा वध केला. ज्या दिवशी श्रीराम रावणवधानंतर अयाध्येला परत आले, त्या दिवशी श्रीरामाच्या विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक म्हणून घरोघरी ब्रह्मध्वज म्हणजे गुढी उभारली होती. हिंदु संस्कृतीतील प्रत्येकच सण खगोलीय घटना, संस्कृती, ऐतिहासिक संदर्भ यांच्याशी निगडित आहेत. तरीही अनेक जण कुठलाही शास्त्रीय आधार नसलेला 1 जानेवारी हा दिवस नवीन वर्ष म्हणून साजरा करतात. हिंदूंना धर्मशिक्षण न मिळण्याचाच हा परिणाम आहे. 
 
सणाच्या शुभेच्छा स्वभाषेतच द्या ! 
 भाषा आणि संस्कृती यांचा जवळचा संबंध आहे. सणाच्या शुभेच्छा देतांना त्या स्वभाषेतच द्यायला हव्यात; पण इंग्रजाळलेल्या अनेक जणांकडून ‘हॅपी गुढीपाडवा’ असे संदेश एकमेकांना दिले जातात. स्वभाषेत शुभेच्छा देण्यासारखी छोटी सूत्रेही आपला संस्कृतीविषयीचा न्यूनगंड बाजूला टाकून अभिमान जागृत करणारी ठरतात. 
 
आरोग्यदायी सण 
 आरोग्य चांगले रहाण्याच्या दृष्टीने या दिवशी कडुनिंब घालून केलेला प्रसाद ग्रहण करतात. दुसर्‍या कुठल्याही वनस्पतीची पाने खाण्यास न सांगता आरोग्यदायी कडुनिंबाची पाने सेवन करण्यास सांगितले आहे. यावरून सण आणि त्याच्याशी निगडित प्रत्येकच कृती किती परिपूर्ण आहे, हे लक्षात येते. 
 
अनंत काळाचे स्मरण करण्याची परंपरा 
 गुढीपाडव्याच्या दिवशी वर्षफल ऐकले जाते. काळाचे स्मरण केले जाते. अनंत काळाचे गणितीय पद्धतीने मापन आणि त्याचे स्मरण करण्याची प्रथा केवळ हिंदु धर्मामध्ये आहे. काळ अनंत असून तो कल्प, मन्वंतर, महायुग, युग असा मोजला जातो. सत्य, द्वापार, त्रेता आणि कलि अशा चार युगांचे एक महायुग गणले जाते. एका महायुगात 43 लाख 20 सहस्र वर्षे असतात. अशा 71 महायुगांचे एक मन्वंतर, 14 मन्वंतराचा एक कल्प, 360 कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचे एक वर्ष असे गणले जाते. सध्या ब्रह्मदेवाच्या 51 व्या वर्षाचा पहिला दिवस म्हणजे श्‍वेतवाराह कल्प चालू असून त्यातील 6 मन्वंतरे पूर्ण होऊन 7 वे वैवस्वत मन्वंतर चालू आहे. यातील 71 महायुगांपैकी 27 महायुगे पूर्ण झाली असून 28 व्या महायुगातील कलियुग चालू आहे. या कलियुगातील 5119 वर्षे पूर्ण होत असून येत्या गुढीपाडव्यापासून 5120 वे वर्ष चालू होत आहे. या अनंत काळाचे स्मरण केल्यावर साहजिकच आपण किती नगण्य आहोत, याची जाणीव होऊन व्यक्तीचा अहंकारही गळून पडतो. कुठे ही कोटी कोटी वर्षांची परंपरा, तर कुठे पाश्‍चात्त्यांची केवळ अडीच सहस्र वर्षांची परंपरा !
         हिंदु धर्मातील सण-उत्सव, प्रथा, परंपरा या चैतन्यमय आणि व्यक्तीतील सत्त्वगुण वृद्धींगत करणार्‍या आहेत. सध्या मात्र या प्रथा, परंपरा, धार्मिक कृती यांना अंधश्रद्धा ठरवून हिंदूंची सनातन धर्माशी असलेली नाळ तोडण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला जात आहे. त्याला बळी न पडता धर्म काय आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. त्यानेच हिंदु धर्माच्या विजयाची गुढी संपूर्ण विश्‍वात उभी करता येर्इल.
जाहिरात
नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।