तीन दुचाकी चोरटे जेरबंद; १८ वाहने जप्त-सावंगी पोलिसांची कारवाई : सीसीटीव्हीचे चित्रिकरण ठरले फायद्याचे

0
688
Google search engine
Google search engine

वर्धा : तीन अट्टल दुचाकी चोरट्यांना सावंगी (मेघे) पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल १८ दुचाकी जप्त केल्या आहेत. वर्धा शहरातील न्यू इंग्लिश शाळेजवळून दुचाकी चोरताना एक तरुण सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्याच चित्रिकरणाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.

पंकज उर्फ गोलू सुर्यवंशी (२५), आकाश चव्हान (२०) व मयुर सोळंकी (२२) सर्व रा. अमरावती, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दुचाकी चोरी करताना पंकज सुर्यवंशी हा सीसीटीव्हीत कैद झाला होता. सदर चित्रिकरण पोलिसांना मिळताच तपासाला गती देण्यात आली. दरम्यान खात्रिदायक माहितीच्या आधारे सर्व प्रथम पोलिसांनी पंकजला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी हिसका दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची माहिती दिली. त्यावरून आकाश चव्हाण व मयुर सोळंकी यालाही अटक करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या या तिनही चोरट्यांविरुद्ध यापूर्वी चोरीचे कुठलेही गुन्हे दाखल नसले तरी त्यांच्याकडून तब्बल चोरीच्या १८ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सदर तीनही तरुण अट्टल चोरटे असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई सावंगी (मेघे) पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री संतोष शेगावकर, श्री रामदास बिसणे, संघसेन कांबळे, श्री प्रदीप राऊत, विकास अवचट, श्री प्रविण मुंडे आदींनी केली.

जेरबंद करण्यात आलेल्या तिनही आरोपींनी वर्धा जिल्ह्यातील विविध भागातून व जिल्ह्याबाहेरूनही वाहने चोरट्याची कबुली पोलिसांना दिली आहे. सदर तरुण दुचाकी खरेदी करणाऱ्याना दुचाकीवर फायनान्सचे काही पैसे बाकी आहेत, ते तूम्ही देऊन दुचाकी ठेऊन घ्या, असे सांगत दुचाकीची विक्री करीत होते, असे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.