जलसाक्षरता कार्यशाळेत-जल बचतीचा अकोलेकरांचा संकल्प

0
807
Google search engine
Google search engine

अकोला : (संतोष विणके)

जागर फाउंडेशन द्वारा आयोजित जल साक्षरता व जल जागृती कार्यशाळेत अकोलेकरांनी जल बचतीचा संकल्प घेत अकोल्यात जल चळवळीला सुरुवात केली.

स्थानिक अग्रसेन भवनात या कार्यक्रमाचे आयोजन दि.26 मार्चला करण्यात आले होते. वॉटरकप स्पर्धेच्या निमित्ताने राज्यातील 75 तालुक्यांमध्ये पानी फाउंडेशन गावकऱ्यांना जल संवर्धनाचे तांत्रिक प्रशिक्षण देत आहे. त्यामुळे लाखो लोक सामुहिक श्रमदानातून जलसंधारणाच्या कामात स्वतःला वाहून घेत आहेत. मागील तीन वर्षांपासून या अभियानामुळे कोरडी पडलेली शेकडो गावं आज पाणीदार झाली आहेत. त्यामुळं पाणी साठे श्रीमंत झाले आहेत. परंतू शेतकऱ्यांच्या हक्काचं हे पाणी शहरांसाठी राखून ठेवल्या जाते. तसच शहरांकडून जल बचतीसाठी फारसे प्रयत्नही केल्या जात नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांवर एकप्रकारे अन्यायच होतो. हे थांबावे, यासाठी शहरांमध्ये कोणत्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात, याचे मंथन घडवून आणण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे जलतज्ज्ञ डॉ.सुभाष टाले यांनी शहरासाठी जल बचतीचे अनेक छोटे मोठे उपचार यादरम्यान सुचवले. आशिष धाडे या तरुण उद्योजकाने अल्प दरात रेन वॉटर हार्वेस्टिंग कसे होऊ शकते याचे प्रात्यक्षिक दाखवले. याप्रसंगी आयोजकांनी वॉटरकप स्पर्धेत सहभागी गावात श्रमदान व साहित्य वाटपासाठी आवाहन केले.

यावेळी उपस्थित तरुणांनी स्पर्धेत श्रमदान करण्याचा संकल्प केला. तर व्यापारी – उद्योजकांनी आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.यावेळी वाटर कप
स्पर्धेत सहभागी होऊन एकजुटीने काम करणाऱ्या गावांना खोदकामाचे साहित्य वाटप करण्यासाठी अविनाशजी देशमुख, निशिकांत बडगे, राजेश (पिट्टूभाऊ) गोसावी, आनंद वानखडे, प्रशांत नागले, यांनी एकत्रितपणे 16 हजार 500 रुपयांचे साहित्य खरेदी करून दिले. हे साहित्य जागर फाउंडेशनद्वारा दि. 28 मार्च रोजी तेल्हारा तालुक्यातील चंदनपूर गावात वाटप करण्यात येणार आहे.सामाजीक संवेदना जपणाऱ्या या उपक्रमाचे शहरवासीयांनी जोरदार स्वागत केले.