राज्य शासनाच्या विविध विभागांतील ३६ हजार रिक्त पदे भरण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांची मान्यता – दिलासादायक निर्णय

0
693
Google search engine
Google search engine

कृषी क्षेत्रासह ग्रामविकासाला गती देण्यासाठी निर्णय

राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासह ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा-सुविधा पुरविण्यासाठी संबंधित विभागांमधील रिक्त पदांची भरती करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्य शासनातील ३६ हजार पदांची भरती करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली आहे.

गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भात झालेल्या चर्चेला उत्तर देताना, मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या प्रशासनातील विविध विभागांच्या एकूण ७२ हजार रिक्त जागा दोन टप्प्यात भरण्यात येतील, असे जाहीर करुन यंदा पहिल्या टप्प्यात ३६ हजार तर दुसऱ्या टप्प्यात पुढच्या वर्षी ३६ हजार पदभरती करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. या जागा भरताना ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. विशेषत: कृषी आणि ग्रामविकासाशी संबंधित विविध विभागांतील रिक्त पदे अग्रक्रमाने भरण्यात येतील.

🔅 यंदा पहिल्या टप्प्यात भरण्यात येणाऱ्या ३६ हजार पदांमध्ये-

ग्रामविकास विभागातील ११ हजार ५ पदे,

सार्वजनिक आरोग्य विभागातील १० हजार ५६८ पदे,

गृह विभागातील ७ हजार १११ पदे,

कृषी विभागातील २ हजार ५७२ पदे,

पशुसंवर्धन विभागातील १ हजार ४७ पदे,

सार्वजनिक बांधकाम विभागातील ८३७ पदे,

जलसंपदा विभागातील ८२७ पदे,

जलसंधारण विभागातील ४२३ पदे,

मत्स्यव्यवसाय विकास विभागातील ९० या पदांसह

नगरविकास विभागातील १ हजार ६६४ पदांचा समावेश आहे.

🔅 शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणेचे बळकटीकरण होणार असून त्यासोबतच युवकांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होणार आहेत.