अय्यप्पा भक्तांची कथित भक्त आणि पुरोगाम्यांना ‘सर्वोच्च’ चपराक !

0
1635
Google search engine
Google search engine
 सर्वोच्च न्यायालयाने गेल्या मासात शेकडो वर्षांच्या परंपरा पायदळी तुडवत शबरीमला येथील श्री अय्यप्पा स्वामींच्या मंदिरात सर्व वयोगटातील महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुरोगामी आणि नास्तिकतावादी महिलांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला; मात्र अय्यप्पा स्वामींच्या भक्तांनी अभूतपूर्व आंदोलन उभारून मंदिराची परंपरा जोपासण्यासाठी यशस्वी लढा दिला. श्रद्धाळू भाविकांच्या स्वयंस्फूर्त आंदोलनामुळे या महिन्यात मासिक पूजेसाठी ५ दिवस मंदिराचे दरवाजे खुले असतांना एकही आंदोलनकर्ती महिला मंदिरात घुसू शकली नाही. ‘कथित समानतेच्या नावाखाली नास्तिकतावाद्यांच्या आणि पुरोगाम्यांच्या दबावाला बळी पडून हिंदूंच्या धर्मपरंपरांना छेद देण्याचा कुणालाही अधिकार नाही’, असाच संदेश भाविकांच्या आंदोलनातून दिला गेला. अय्यप्पा भक्तांनी लगावलेली ‘सर्वोच्च’ चपराक असे याचे वर्णन करता येईल. 
 हिंदूबहुल भारतात ना कायदे हिंदुहिताला पूरक आहेत, ना शासन-प्रशासन हिंदुहिताच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहे. धर्मनिरपेक्षतेचे भूत मानगुटीवर बसल्याने शालेय अभ्यासक्रमातूनही धर्माची हकालपट्टी झाली आहे. त्यात भर म्हणून सर्वोच्च न्यायालयाकडून हिंदूंच्या धर्मश्रद्धांची पायमल्ली करणारे निर्णय दिले जात आहे. असे असतांनाही केरळमधील हिंदूंनी मार्क्स, मेकॉले, मुल्ला आणि मिशनरी यांचा सामना करत जो लढा उभारला आहे, तो कौतुकास्पद आहे. श्रद्धाळू भाविकांनी उभारलेल्या या आंदोलनाला राजकीय आंदोलनांप्रमाणे पैसे देऊन माणसे बोलवावी लागली नाहीत, तर अय्यप्पा स्वामींचे मंत्र आणि नामजप करत भाविकांनी धर्मरक्षणाच्या भावनेतून हे आंदोलन उभारले. 
 अय्यप्पा स्वामी शबरीमला येथे ब्रह्मचारी रुपात विराजमान असल्याने तेथे मासिक धर्म येणार्‍या स्त्रियांना म्हणजे १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांना प्रवेश निषिद्ध मानला गेला आहे. देवावर भक्ती असलेल्या महिला कुठल्याही विकल्पाविना या मर्यादांचे पालन करतात; मात्र एका मुसलमान व्यक्तीने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी बिगरहिंदू महिला मंदिरामध्ये घुसू पाहत आहे. जर देवालयात जाऊ पहाणार्‍या महिलांना अय्यप्पा स्वामींविषयी श्रद्धा असती, तर हेकेखोरपणे शेकडो वर्षांच्या परंपरा मोडण्याचा विचारही त्यांनी केला नसता. 
शबरीमला येथील देवस्थानात घुसू पहाणार्‍यांमध्ये रेहाना फातिमा, मेरी स्वीटी यांचा समावेश होता. मशिदींमध्ये महिलाप्रवेशाला प्रतिबंध असतांना रेहाना यांना तेथे घुसावे आणि आंदोलन करावे, असे वाटत नाही; मात्र शबरीमला येथील मंदिर भ्रष्ट करण्यासाठी त्यांचे पाय शिवशिवतात ! कहर म्हणजे रेहाना आणि त्यांच्यासह असणार्‍या भाग्यनगर येथील पत्रकार कविता जक्कल यांना मंदिरात प्रवेश करता यावा, यासाठी केरळच्या साम्यवादी सरकारने २०० ते २५० पोलिसांचा फौजफाटा तैनात केला होता. आज एखादी हिंदू महिला मुसलमान आंदोलक लाखोंच्या संख्येने आंदोलन करत असतांना मशिदीमध्ये घुसू धजावेल का ? भारतात सहिष्णू कोण आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण जिहाद करत आहे, हे या परिस्थितीवरून लक्षात येते. 
सरकारने कायदा करावा 
 परंपरा अबाधित राखण्यासाठी लाखो हिंदू रस्त्यावर उतरले असतांना खरे तर सरकारने या प्रकरणी बहुसंख्यांक हिंदूंच्या श्रद्धांचा सन्मान करण्यासाठी पावले उचलायली हवीत. केरळमधील साम्यवादी सरकार आणि केंद्रातील भाजप सरकार दोघेही याकडे मूकपणे पहात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊनही शहाबानो प्रकरण, एट्रोसिटी कायदा यांच्यासंदर्भात सरकार कायदा करू शकते, तर हिंदूंच्या धर्मपरंपरांच्या रक्षणासाठी कायदा का करू शकत नाही ? केरळमध्ये भाजपने भाविकांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन सहभाग घेतला आहे, तर केंद्रातील भाजप सरकार ढिम्म आहे. याला केरळमधील भाजपचा राजकीय स्वार्थ म्हणायचा, केंद्रातील भाजपची निष्क्रीयता म्हणायची कि तत्त्वशून्य राजकारण ? याची किंमत येणार्‍या निवडणुकांमध्ये चुकवावी लागणार नाही, याविषयी राजकीय पक्षांना खात्री आहे काय ? 
 श्रद्धास्थाने भ्रष्ट केली, देवालये उद्ध्वस्त केली, परंपरा मोडीत काढल्या, तर काय होते, याला इतिहास साक्ष आहे. महंमद गझनीपासून अफझलखानापर्यंतच्या परकीय आक्रमकांनी तेच तर केले होते, जे आज ‘स्वतंत्र’ (?) भारतात लोकशाहीचे स्तंभ म्हणवल्या जाणार्‍या घटकांकडून केले जात आहे. परकीयांची कितीही आक्रमणे झाली, तरी त्यांना हरवून भारतात हिंदूंचे शासन स्थापन झाल्याचा इतिहास आहे. केरळमध्ये अय्यप्पा स्वामींच्या भक्तांनी जे आंदोलन उभारले आहे, ते त्याचीच नांदी आहे. 
 
–  श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था.


संपर्क : 7775858387