राजस्थानवरून रिकाम्या हातांनी परतले चांदूर रेल्वे पोलीस – मुख्य आरोपीला अटक करण्यात पोलीसांना अपयश

0
762
Google search engine
Google search engine
नकली नोटांचे प्रकरण
चांदूर रेल्वे – शहेजाद खान – 
      चांदूर रेल्वे शहरातील नकली नोटांच्या प्रकरणात मुख्य आरोपीच्या शोधात राजस्थानला गेलेल्या चांदूर रेल्वे पोलीसांना रिकाम्या हातांनी परत यावे लागले आहे. मुख्य आरोपीला पकडण्यात चांदूर रेल्वे पोलीसांना अपयश आले असुन नकली नोटांचे मोठे रॅकेट सापडणार की नाही ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
        शहरातील गांधी चौकातील एका किराणा दुकानात २७ जानेवारी रोजी आट्याचे बॅग घेतल्यानंतर आरोपी ईस्माईल खान वल्द समशूद खान (३५) रा. खिडकी ता. नवाई जि. टोक (राजस्थान) याने नकली दोन हजाराची नोट यांना दिली. दुकानदाराला नोटवर संशय आला व ही नोट नकली असल्याचे समजले. सदर बाब आरोपीला समजताच त्याने आपल्याजवळ असलेल्या ३ दोन हजारांच्या नोटा फेकुन दिल्या. व पळण्याच्या स्थितीत असतांना नागरीकांनी सदर आरोपीला पकडून ठेवले व पोलीसांना पाचारण केले. या प्रकरणात पोलीसांनी एकुण ७  दोन हजारांच्या नोटा व १ दोनशे रूपयाची नोट अशा एकुण ८ नकली नोटा जप्त केल्या होत्या व काही नोटांचे नंबरही सारखेच आहे. या प्रकरणाचे तार राजस्थानपर्यंत जुळले असल्याने मुख्य आरोपीच्या शोधात चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनचे पीएसआय भारत लसंते यांच्या नेतृत्वात ६ कर्मचाऱ्यांची चमु मंगळवारी चांदूर रेल्वेवरून राजस्थानसाठी रवाना झाले होते. परंतु शुक्रवारी राजस्थानवरून त्यांना चांदूर रेल्वेला तसेच परत यावे लागले. आरोपीला पोलीस येण्याची माहिती मिळाल्याने त्याने पलायन केल्याचे समजते. त्यामुळे पोलीसांना आरोपीला अटक करण्यात अपयश आले आहे. मात्र आता चांदूर रेल्वे पोलीसांना नकली नोटांचे मोठे रॅकेट सापडणार काय ? हे येणार काळच सांगेल. या प्रकरणाचा तपास ठाणेदार ब्रम्हदेव शेळकेंच्या मार्गदर्शनात पीएसआय लसंते करीत आहे.