एसडीओ नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे होत आहे हाल निकालानंतर पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची कागदपत्रांकरीता लगबग

0
915
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे : – (शहेजाद खान )-

दहावी, बारावीचे निकाल लागल्यानंतर पुढील प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांची लगबग सुरू होते. सर्वप्रथम विविध प्रमाणपत्रांकरिता उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे विद्यार्थी धाव घेतात. पण तेथून वेळेत प्रमाणपत्र मिळत नसल्याने तारांबळ उडत असल्याचे चित्र आहे. नुकत्याच रूजु झालेल्या उपविभागीय अधिकारी सुट्टीवर गेल्याने तीन ते चार दिवसांपासूनची प्रकरणे प्रलंबित राहत आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांद्वारे रोष व्यक्त होत आहे.
     चांदुर रेल्वे उपविभागात चांदुर रेल्वे व धामणगाव रेल्वे या तालुक्यांचा समावेश आहे. दोनही  तालुक्यांतील मोठ्या प्रमाणात प्रमाणपत्रांची प्रकरणे स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयात येत आहेत. निकालानंतर आता कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांची उपविभागीय कार्यालयात गर्दी सुरू झाली आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशाकरिता महत्त्वाची ठरणारी ही प्रमाणपत्रे वेळेत होणे अपेक्षित आहे. गत तीन ते चार दिवसांपासून एसडीओ कार्यालयात विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी होत आहे. कारण उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे यांची १०-१२ दिवसांपुर्वी बदली झाली. त्यांची जागी रूजु झालेल्या नवीन उपविभागीय अधिकाऱ्यांनी पदभार सांभाळताच त्या सुट्टीवर गेल्या आहे. त्यांच्या जागी २-३ दिवसांसाठी तहसिलदार यांच्याकडे प्रभारी पदभार देण्यात आला होता. मात्र त्यानंतरही नवीन उपविभागीय अधिकारी पुन्हा रूजु झालेले नाही. गेल्या ३-४ दिवसांपासुन उपविभागीय अधिकारी पदावर कोणीही उपस्थित नाही. यामुळे अनेक प्रकरणे प्रलंबित राहत असल्याने प्रवेशापासून वंचित तर राहावे लागणार नाही ना, अशी भीती विद्यार्थी, पालक व्यक्त करीत आहेत. सध्या आवश्यक असलेल्या जात, नॉन क्रिमीलेअर यासह अन्य प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थी व पालक एसडीओ कार्यालयात दररोज चकरा मारत असल्याचे समजते. जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष देत विद्यार्थ्यांना वेळेत प्रमाणपत्र मिळावे, याकरिता उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पालकांतून होत आहे.