कर्जमाफीकरिता ऑनलाईन अर्जासाठी राज्यात 25 हजार केंद्र – मुख्यमंत्री

0
871
Google search engine
Google search engine

छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना अंमलबजावणीचे काम सुरु

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – शेतकऱ्यासाठी जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजने अंतर्गत कर्जमाफीची प्रत्यक्ष कार्यवाही सुरुवात करण्यात येत आहे. यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद पुरवणी मागणीद्वारे करण्यात येणार आहे.  ‘आपले सरकार’  या वेब पोर्टलच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. यासाठी राज्यात 25 हजार केंद्र उभारण्यात आली आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान एक केंद्र असणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. आज पासून सुरु होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजने अंतर्गत मिळणाऱ्या लाभासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत. या अर्जासोबत आधार क्रमांक, बँक खात्याची माहिती, कुटुंबाची माहिती व स्वघोषणापत्र द्यावे लागणार आहे. योग्य लाभार्थ्यालाच याचा लाभ मिळावा यासाठी ही प्रक्रिया सुटसुटीत आणि सोपी ठेवण्यात आली आहे. या अधिवेशनात चर्चेला येणाऱ्या सकारात्मक व्यवहार्य सूचनांचा स्वीकार केला जाईल, असेही फडणवीस म्हणाले. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी दिली. यामध्ये प्रामुख्याने कृषी, गृह, नगरविकास, गृहनिर्माण आदी विभागाशी संबंधित प्रश्न होते. राज्यात दुबार पेरणीचे संकट टळलेले असून जवळपास 88.3 टक्के पेरण्या झाल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. तुर खरेदीबाबत माहिती सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, 3 हजार 341 कोटी 32 लाख रुपये म्हणजे सुमारे 93 टक्के रक्कम अदा करण्यात आली आहे.

अधिवेशनात 21 विधेयके

विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशनात एकूण 21 विधेयके मांडण्यात येतील. यात 14 प्रस्तावित विधेयके, विधान परिषदेतील 7 प्रलंबित विधेयके यांचा समावेश असेल. सकारात्मक चर्चा होऊन त्यातून निश्चितच वंचितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेत मंत्री महोदय सर्वश्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, दिवाकर रावते, सुभाष देसाई, पांडुरंग फुंडकर, एकनाथ शिंदे, बबनराव लोणीकर, प्रा. राम शिंदे, जयकुमार रावल आणि सुभाष देशमुख आदी उपस्थित होते.