जिल्ह्यातील प्रत्येक ऑनलाईन सातबारा अचूक बनवा – विभागीय आयुक्त श्री पियुष सिंह

0
888
Google search engine
Google search engine

• जिल्हाधिकारी कार्यलयात महसूल विभागाची आढावा बैठक
• ‘एटीडीएम’द्वारे मंडळ स्तरावर मिळणार ऑनलाईन सातबारा, जुने अभिलेख
• जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेचे विभागीय आयुक्तांनी केले कौतुक

 

नागरिकांना अचूक ऑनलाईन सातबारा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने चावडी वाचन मोहिमेंतर्गत जिल्ह्यात १०० टक्के ऑनलाईन सातबाराचे चावडी वाचन झाले आहे, ही अतिशय चांगली बाब असून या मोहिमे अंतर्गत निदर्शनास आलेल्या त्रुटींची दुरुस्ती करून प्रत्येक ऑनलाईन सातबारा अधिकाधिक अचूक बनविण्याच्या सूचना अमरावती विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महसूल विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, महसूल उपायुक्त प्रदीप पुरी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, भूसंपादन अधिकारी श्री. वानखेडे, एमएसआरडीसीचे उपजिल्हाधिकारी सुनील माळी, उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, डॉ. शरद जावळे, अभिषेक देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव, जयंत शिंदे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

विभागीय आयुक्त म्हणाले की, दि. १५ ऑगस्ट पासून सातबारासह इतर १८ प्रकारच्या महसुली सेवा ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्यादृष्टीने नागरिकांना जास्तीत जास्त अचूक दाखले व सातबारा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा. तसेच चावडी वाचन दरम्यान ऑनलाईन सातबारामध्ये आढळलेल्या सर्व त्रुटींची दुरुस्ती दि. १५ ऑगस्ट २०१७ पूर्वी करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात यावे. जेणेकरून नागरिकांना अधिकाधिक अचूक सातबारा ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध होऊ शकेल.

ऑनलाईन सातबारा विषयी माहिती देताना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले की, जिल्ह्यात चावडी वाचन मोहिमेंतर्गत निदर्शनास आलेल्या त्रुटी या अतिशय किरकोळ स्वरूपाच्या असून या त्रुटींची दुरुस्ती करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. तसेच नागरिकांना ऑनलाईन सातबारा व जुन्या अभिलेखांच्या प्रती सहजरीत्या उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ‘एनी टाईम डॉक्युमेंटस मशीन’ अर्थात ‘एटीडीएम’ क्यू-ऑस मशीन कार्यान्वित करण्यात आली आहे. यामाध्यमातून ४४ लक्ष ८७ हजार ७८६ अभिलेख नागरिकांना एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याच धर्तीवर सर्व तहसीलदार कार्यालयांमध्ये दि. १५ ऑगस्ट पर्यंत ‘एटीडीएम’ मशीन कार्यान्वित केले जाणार आहेत. आगामी काळात जिल्ह्यातील सर्व मंडळ स्तरावत बचत गटांच्या माध्यमातून ‘एटीडीएम’ मशीन कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना ऑनलाईन सातबारा व जुने अभिलेख यांच्या प्रती मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय येथे हेलपाटे मारण्याची आवश्यकता भासणार नाही. हे सर्व अभिलेख त्यांना मंडळ स्तरावरच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. मंडळ स्तरावर एटीडीएम मशीन बसविण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेचे विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी यावेळी कौतुक केले. तसेच विभागातील इतर जिल्ह्यांसाठी सुध्दा हा उपक्रम मार्गदर्शक ठरेल, असे मत व्यक्त केले.