अंगणवाडी पोषण आहार पुरवठ्यात ५ हजार कोटींचा घोटाळा – प्रीती मेनन

0
668
Google search engine
Google search engine

महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि भाजपा महाराष्ट्र अध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील सहभाग असल्याचा गंभीर आरोप 

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – राज्य सरकारच्या एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत अंगणवाड्यांना दिल्या जाणार्‍या पोषण आहाराच्या पुरवठ्यासाठी बचतगटांच्या नावाखाली खाजगी कंपन्यांना ‘उपकंत्राट’ देऊन सुमारे ४८00 कोटींचा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यात राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि भाजपा महाराष्ट्र अध्यक्ष रावसाहेब दानवे यांचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप ‘आम आदमी पक्षा’ च्या प्रीती मेनन यांनी केला. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पंकजा मुंडे यांनी पदाचा राजीनामा द्यावा, या घोटाळ्याची सखोल चौकशी करून कंत्राटाच्या निविदा पुन्हा काढाव्यात आणि घोटाळ्यात सहभागी तीन खाजगी संस्थांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी मेनन यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्यातील अंगणवाड्यांना आहार पुरवठा करण्यासाठी बचत गटाच्या नावाखाली वेगळ्याच संस्थांना कंत्राट देण्यात आले आहे, असे सांगून त्याचे पुरावे मेनन यांनी सादर केले. मद्य निर्मिती क्षेत्रातील ‘लिकर बॅरन’ एन. व्ही. ग्रुपचे अशोक जैन, सतीश मुंडे, पंकजा यांचे पती चारुदत्त पालवे हे संचालक असलेल्या कंपन्यांना ही कंत्राटे देण्यात आली आहेत, असा आरोप मेनन यांनी केला आहे. ‘महालक्ष्मी, व्यंकटेश आणि महाराष्ट्र’ या तीन बचतगटांना ८८ टक्के कंत्राट देण्यात आले असून त्याची किंमत ४८00 कोटी आहे. हे सगळे बचतगट पुरुष चालवत असून ते आपापसात एकमेकांशी संलग्न असल्याचा दावा त्यांनी केला. रावसाहेब दानवे यांचे पीए अतुल वाजरकर हे ‘मोरेश्‍वर’ बचतगटाशी संलग्न आहेत. त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात बचतगटाचा पत्ता ‘भाजपा कार्यालय, जालना’ असा दिला आहे. मोरेश्‍वर बचतगटाच्या खात्यातून आर डी. दानवे यांना पाच लाख रुपये दिल्याचे बँकेचे स्टेटमेंट आहे. त्यामुळे हे ‘आर. डी. दानवे’ कोण याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावा, अशीही मागणी मेनन यांनी केली आहे. भाजपाने काँग्रेसच्या भयानक घोटाळ्याची पुनरावृत्ती केली आहे, असा आरोप प्रीती मेनन यांनी केला आहे. मेनन यांच्या आरोपामुळे मुंडे आणि दानवे नव्या वादात सापडले आहेत.