जनावरांच्या अवैध वाहतुकीकरीता नाकाबंदी करा – DM – श्री सुहास दिवसे

0
1234
Google search engine
Google search engine


भंडारा – जिल्हयात येणाऱ्या व जाणाऱ्या जनावरांची जिल्हयाच्या सिमेवरील टोल नाक्यांवर तपासणी करण्यात यावी. तसेच जनावरांची अवैध वाहतुकीकरीता नाकाबंदी करावी व अवैध वाहतुकीवर पूर्णपणे आळा घालण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले. 
प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. याबैठकीस समिती सदस्य जिल्हा पशुसंवर्ध उपायुक्त डॉ. के.एस. कुंभरे, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत झाडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर.बी. शहारे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. सुरेश कुंभरे, सहाय्यक वन अधिकारी पी. जी. कोडापे, सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश काळे उपस्थित होते.
या बैठकीत केंद्राचा प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा 1960 तसेच महाराष्ट्र शासनाचा प्राणी संरक्षण कायदा 1976 व महाराष्ट्र प्राणी संरक्षण ( सुधारणा) अधिनियम 1995 (4 मार्च 2015 पासून महाराष्ट्रात लागू) मधील नियम व अटींचे सविस्तर माहिती देण्यात आली. सदर कायदयाप्रमाणे गाई, वळु व बैल यांची कत्तल करण्यास मनाई आहे व गोवंशीय प्राण्यांची कत्तलीकरीता वाहतूक निर्यात करण्यास मनाई आहे. गोवंशाची कत्तली करीता तसेच खरेदी व विक्री करण्यास मनाई असून कायदयातील कलमानुसार अपराध्यास 10 हजार दंड व यांचे उलंघन केल्यास 2 हजार व एक वर्ष कारावास असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. प्राण्यावर अत्याचार होवू नये म्हणून जनावरांची वाहतूक करतांना ईजा होणार नाही तसेच क्षमतेपेक्षा जास्त जनावरे ट्रकमध्ये वाहतूक होणार नाही याची काळजी घेण्यासंबंधी तसेच गोवंश हत्याबंदी कायदयाचे प्रसार आणि प्रचार गावागावातून करण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत प्रयत्न करण्यात यावा, असे जिल्हाधिकारी यांनी सूचित केले.
सन 2016-17 पर्यंत प्राणी कल्याण कायदयांतर्गत गुन्हयांची संख्या 40 गुन्हे दाखल असल्याचे पोलीस निरीक्षक गणेश काळे यांनी सांगितले. जिल्हयातील गोरक्षण संस्थेकडे उपलब्ध सुविधा, जनावरे ठेवण्याची क्षमता, जनावरांची संख्या, त्यांच्या प्रवर्गानूसार, वयानूसार वर्गीकरण याबाबत पशुसंवर्धन विभागाने माहिती सदर संस्था संकलित करण्याबाबत सूचना दिल्या. गोरक्षण संस्थेकडील उपलब्ध असलेल्या जनावरांना रोग प्रतिबंधक लसीकरण, आजारी जनावरांवर उपचार याबाबत विचारणा केली. त्याअनुषंगाने जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी जनावरांना संबंधित कार्यक्षेत्रातील दवाखान्यामार्फत सेवा देण्यात येत असल्याचे सांगितले.