जिल्हयात अद्ययावत रेशीम उद्योग प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार —जिल्हाधिकारी श्री सुहास दिवसे

0
619
Google search engine
Google search engine
 पर्यटनाला रेशीम लिंक होणार
आधुनिक यंत्राची व्यवस्था 
 बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत
 

भंडारा  – 

चौदाशे मिलीमिटर पाऊस पडणाऱ्या भंडारा जिल्हयाचे स्वत:चे वेगळेपण असून मुबलक पाणी, 34 टक्के जंगल, वाघ व रेशीम ही जिल्हायाचे खास वैशिष्टये आहेत. या जिल्हयात मुख्य पिक धान असले तरी शेतीपूरक व्यवसायावर लक्ष केंद्रीत करण्यात आले असून रेशीम उत्पादन हा त्यापैकीच एक व्यवसाय आहे. जगात रेशीमला मागणी असल्यामुळे उत्तम व दर्जेदार रेशीम उत्पादन आपल्या जिल्हयात तयार व्हावे व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टिकावे यासाठी जिल्हयात दोन अद्ययावत रेशीम उद्योग प्रशिक्षण केंद्र उभारण्याची प्रशासनाची तयारी असल्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितले.
जमनी येथील सुविधा केंद्रात आयोजित रेशीम प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. नगराध्यक्ष सुनिल मेंढे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. केंद्रीय रेशीम अनुसंधान संस्थेचे संचालक डॉ. सुभाष नाईक, रेशीम संचालनालयाचे उपसंचालक ए.एम.गोरे व जिल्हा रेशीम विकास अधिकारी रायसिंग पाहुणे म्हणून उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. 
रेशीम उद्योग हा कष्टाचा व्यवसाय असून त्यामुळे महिला या व्यवसायात अधिक प्रमाणात आहेत. या महिलांना प्रशिक्षीत केल्यास या व्यवसायाला भरभराटी प्राप्त होवू शकते. रेशीमच्या कापडाना जगभरात मोठया प्रमाणात मागणी असून उत्पादन ते बाजारपेठ या बाबीचे व्यवस्थापण आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. उत्पादन आणि बाजारपेठ यामधील दुवा बनण्याचे काम प्रशासन करणार आहे. यासाठीच कोष काढण्यापासून ते रिलींगपर्यंतच्या सर्व प्रक्रीयेसाठी जिल्हयात दोन अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येतील. यासाठी रेशीम विकास कार्यालयाने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही त्यांनी दिली. 
उद्दिष्ट डोळयासमोर ठेवून रेशीम उत्पादन करावे, जिल्हयाचा ब्रान्ड विकसीत करावा व बाजारपेठेचे सर्व्हेक्षण करुन मागणी नुसार निर्मिती करावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले. रेशीम उद्योग पर्यटनाला लिंक करण्याची कल्पना मांडून जिल्हाधिकारी म्हणाले की, विदर्भात येणाऱ्या पर्यटकांना आपल्या जिल्हयातील रेशीम उद्योगाला भेट देण्याचा मोह पडावा अशा स्वरुपाचे केंद्र उभे करावे यासाठी सर्व सहकार्य देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी बोलतांना नगराध्यक्ष सुनिल मेंढे म्हणाले की, जिल्हयाची ओळख असलेला रेशीम व्यवसाय पारंपारीक पध्दतीने न करता आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करुन जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे. योग्य प्रशिक्षण व बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे येथील विणकर समाज सुरतला स्थलांतरीत होत आहे. रेशीम विभागाने प्रशिक्षण व सुविधा उपलब्ध करुन या समाजाला जिल्हयातच उद्योगाची संधी निर्माण करुन दयाव्यात.
पारंपारीक माठावर कोष विणण्याचे काम न करता केंद्र सरकारने तयार केलेल्या बुनीयाद यंत्रावर तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती संचालक डॉ. सुभाष नाईक यांनी दिले. हे यंत्र जमनी येथे ठेवण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण हवे असेल त्यांना विनामुल्य उपलब्ध करुन दयावे असेही ते म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रेशीम उत्पादित वस्तुंच्या स्टॉलला भेट दिली. यावेळी अनेक राज्यातील तज्ञ मार्गदर्शकांनी रेशीमच्या नवीन तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन केले.