जातीव्यवस्थेमुळे हिंदु समाज जातीजातींत विभाजित झाला, हा राजकीय अपप्रचार ! – श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

0
656
Google search engine
Google search engine

कोटला कला (उत्तरप्रदेश) येथेे ‘हिंदु समाजाविषयीचे अपसमज आणि धर्मशिक्षणाची आवश्यकता’ या विषयावर प्रवचन

 

कोटवा कला, पडरौना (उत्तरप्रदेश) – जातीव्यवस्थेमुळे हिंदु समाज जातीजातींत विभाजित झाला, हा राजकीय अपप्रचार गेली काही वर्षे हेतुपुरस्सर केला गेला आहे. जातीव्यवस्था एक शास्त्रीय व्यवस्था होती. जर्मन दार्शनिक नित्शेने यांनी ‘भारतीय जातीव्यवस्था ही जगातील सर्वांत शास्त्रीय समाजरचना आणि सुप्रजननशास्त्राला पूरक व्यवस्था आहे’, असे अभ्यासांती सांगितले होते. भारतात जातीयवाद हा राज्यव्यवस्थेद्वारा प्रायोजित (स्टेट स्पॉन्सर्ड) आहे. हिंदूंना जातीयवादी ठरवण्यापेक्षा शिक्षण, नोकरी आणि राजनीती यांमधील जातीयवाद प्रथम संपवण्याचे कार्य करायला हवे. वर्तमान लोकशाहीत हे शक्य नाही, तर धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रात हे परिवर्तन शक्य आहे; म्हणून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात जातीभेद विसरून कार्यरत व्हा, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. येथील ‘आस्था’ या स्वयंसेवी संघटनेकडून आयोजित कार्यक्रमात ते ‘हिंदु समाजाविषयीचे अपसमज आणि धर्मशिक्षणाची आवश्यकता’, या विषयावर बोलत होते.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश-बिहार समन्वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी हेही उपस्थित होते. श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी यांनी समितीच्या कार्याचा परिचय करून देत ‘धर्मशिक्षणाचे महत्त्व’ विषद केले. या कार्यक्रमाचा लाभ ५० जणांनी घेतला.

श्री. राजहंस पुढे म्हणाले, ‘‘इंग्रजांनी वर्ष १८८१ मध्ये पहिल्यांदा जातीनिहाय जनगणना करून हिंदू जातीजातींत विभाजित आहेत, असे दाखवण्याचा दुष्ट प्रयत्न केला. त्यांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी जातीयवाद वाढवणारी सरकारी धोरणे राबवली. वर्ष १९३७ मध्ये काँग्रेसने प्रथमच निवडणुका लढवतांना हा जातीयवाद वाढेल, असा प्रसार केला. पुढे स्वातंत्र्यानंतर सर्व राजकीय पक्ष जातीगत समीकरणांद्वारे निवडणुका जिंकू लागले. सरकार आणि व्यवस्था प्रायोजित जातीयवादामुळेच हिंदु समाजातील जातीजातींत फूट पडली आहे. या समस्येसाठी हिंदु समाजाला दोष देऊ नका, तर राज्यव्यवस्थेला द्या !’’

या वेळी मासिक धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याचे निश्‍चित करण्यात आले.