रोज उठल्यावर भगवंताचे स्मरण करण्याचा नियम ठेवावा. स्नान वगैरे गोष्टी झाल्या तर कराव्याच, पण त्या वाचून अडून बसू नये.

0
894
Google search engine
Google search engine

 

शंका न ठेवता नाम घ्यावे.

 

नामस्मरण करायला सांगितले की सबबी सांगतात. पण खरोखर, नामस्मरण करण्याच्या आड काहीच येत नाही. काम करीत असताना सुद्धा उगाचच इतर विचार मनात येतातच ना ? मग तसेच नामस्मरण करायला कोणती अडचण आहे ? उगाच दुसरे विचार करण्यापेक्षा भगवंताचे नाम घ्यावे हे बरे नाही का ? वेळ सापडताच तो व्यर्थ न घालविता नामस्मरण करावे; श्रद्धा ठेवून करावे. दोन प्रवासी पायी जात होते. त्यांना भूक लागली. जाताना एक आंबराई लागली. त्यांनी मालकाला विचारले, ‘आंबे घेऊ का ?’ मालक म्हणाला, ‘पंधरा मिनिटांत जितके आंबे खाता येतील तितके खा.’ दोघांपैकी एक होता, तो मालकाजवळ चौकशी करू लागला; या शेताला पटटी किती, मालक कोण, वगैरे पुष्कळ विचारपूस करू लागला. दुसरा मात्र भराभर आंबे खाऊ लागला. इतक्यात पंधरा मिनिटे झाली. मालकाने सांगितले, ‘वेळ संपली, आता तुम्ही जा.’ एकाचे पोट भरले, दुसरा मात्र उपाशी राहिला. या गोष्टीवरून हे ध्यानात घ्यायचे की, नुसते प्रश्न विचारण्यापेक्षा, श्रद्धा ठेवून नाम घेऊ लागावे. नामाचा अर्थ आपल्याला जरी कळला नाही, तरी तो भगवंताला कळतो. म्हणून नामाचे महत्त्व कळो वा न कळो, नाम घेत राहावे. ध्रुवाने काय केले ? नारदवचनावर विश्वास ठेवून नामस्मरण प्रेमाने करू लागला. तो इतर विचारांच्या, शंका कुशंकांच्या नादी लागलाच नाही. ‘एक तत्त्व नाम’ हेच त्याने धरले, म्हणून त्याला नारायण प्रसन्न झाला. संत निःस्वार्थी असतात. ते तळमळीने सांगतात. त्यावर आपण श्रद्धा ठेवावी आणि नाम घ्यायला सुरूवात करावी आणि अखंड नामातच राहावे.

नाम किती दिवस घेत राहावे ? नाम सोडावेसे वाटत नाही तोपर्यंत ते घ्यावे. नामात रंगून जाईपर्यंत नाम घ्यावे. नामस्मरणात रंगला की नाम सुटणारच नाही. भगवंताचे नाम हेच श्रेष्ठ आहे. त्या नामात रंगेल तोच खरा. चरित्र विसरले तरी चालेल पण नाम विसरू नये, कारण नामात सर्व चरित्र साठविलेले आहे. ज्ञान, उपासना, कर्म वगैरे मार्ग आहेत, पण सर्वांत नामस्मरण हे सोपे साधन आहे. एक मोठा किल्ला होता. तो अभेद्य होता. मुंगीलाही आत प्रवेश होणे अशक्य असा तट होता. पण त्याला एक मोठा दरवाजा होता. त्याला एक मोठे कुलूप होते. एकाला त्याची किल्ली मिळाली; मग प्रवेश सुलभ झाला. तसे नाम ही किल्ली आहे. परमार्थ कितीही कठीण असला तरी नामाने तो सुसाध्य असतो. नामावर प्रेम आणि श्रद्धा बसत नाही अशी तक्रार करतात. संतवचनावर विश्वास ठेवून अखंड नाम घ्यावे, त्यानेच समाधान होईल.