कामगार कल्याण मंडळाचा गरीब कामगार पाल्यांना दिलासा

0
1817
Google search engine
Google search engine

बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील १९०० विद्यार्थ्यांना ५२ लाख २७ हजारांचे अर्थसहाय्य

बीड परळी : नितीन ढाकणे

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील १९१९ कामगार व कामगार कुटुंबीयांना विविध योजनांच्या माध्यमातून ५२ लाख २७ हजार ८३१ रुपयांचे अर्थसाहाय्य करून गरीब कामगार व कामगार पाल्यांना दिलासा देण्याचे काम कामगार कल्याण मंडळाने या तीन जिल्ह्यातील नऊ कामगार कल्याण केंद्राच्या कार्यालयातून केले आहे.
कामगार कल्याण मंडळाने बीड, लातूर व उस्मानाबाद या जिल्ह्यातील मंडळाच्या विविध योजना प्रभावीपणे कामगारांपर्यंत पोहोचवून एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना लाभ मिळवून दिला आहे. यात कामगार पाल्यांना शिष्यवृत्ती योजनेतून १६२० पाल्यांना ३८ लाख १२ हजार, पाठ्यपुस्तक सहाय्यता योजनेंतर्गत १४० कामगार पाल्यांना २ लाख ६८ हजार ३१ रुपये, तर परदेशी उच्चशिक्षण घेणाऱ्या ४ विद्यार्थ्यांना २ लाख रुपये, एम.पी.एस. सी. व यु.पी.एस.सी. पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या १४ पाल्यांना ८२ हजार, अपंग व दिव्यांग ८ कामगार पाल्यांना २१ हजार ५०० रुपये, शासनाचे एमएससी-आयटी कोर्स पूर्ण करणाऱ्या ९१ पाल्यांना १ लाख ५९ हजार ३०० रुपये तर क्रीडा शिष्‍यवृत्ती एका पाल्यास ५ हजार रुपये देण्यात आले. दहावी-बारावी मधील ९० टक्केपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या ६ पाल्यांना ३० हजार रुपयांचे लाभ देण्यात आले आहे. हृदयरोग, कर्करोग, मूत्रपिंड, ब्रेन ट्यूमर, कोमा, गॅगरीन व क्षयरोगासाठी गंभीर आजार योजनेंतर्गत ३५ कामगार व कामगार कुटुंबीयांना ६ लाख ५० हजारांचे अर्थसहाय्य देण्यात आले.
सन १७-१८ मध्ये हे लाभ कामगार व कामगार कुटुंबियांना देण्यात आले. मंजूर रक्कम लाभार्थींच्या वैयक्तिक बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे.
साखर कारखाने, एसटी महामंडळ, वीज कंपनी, बँका, ऑईल मिल, दूध डेरी, पणन मंडळ, वखार मंडळ, जीवन प्राधिकरण, विविध कंपन्या आदी क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगार व कुटुंबियांना ही मदत केली गेली.

कामगार व कामगार पाल्यांच्या प्रतिक्रिया….

मी साखर कारखाना कामगार आहे. माझ्या आईला मूत्रपिंड आजार झाला. आईच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक अडचण येत होती परंतु कामगार केंद्राने १५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली. यामुळे शस्त्रक्रियेसाठी मदत झाली.
सिद्धेश्वर हाडबे
कामगार, वैद्यनाथ शुगर.

माझे वडील आईल मिल कामगार असून त्यांना खूप कमी पगार आहे. मी इंजिनिअरिंग करत आहे. मला ५ हजार रुपये शिष्यवृत्ती व पुस्तक खरेदीसाठी २५०० रुपये मिळाले. यामुळे मला आर्थिक पाठबळ मिळू प्रेरणा मिळते.
प्रतिक पांडे
कामगार पाल्य

योजनांचा लाभ घ्यावा
कामगारांसाठी इंग्रजी संभाषण वर्ग, करिअर मार्गदर्शन, रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण, नाट्य-भजन, लोकनृत्य, कविसंमेलन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यासह विविध योजना व उपक्रम राबविले जाते. याचाही लाभ घ्यावा असे आवाहन कामगार कल्याण अधिकारी मनोज पाटील व परळीचे केंद्र संचालक आरेफ शेख यांनी केले आहे.