शहरात शनिवार- रविवारी जनता कर्फ्य – नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे :- जिल्हाधिकारी शैलेश नवाल

0
4268
Google search engine
Google search engine

अमरावती : कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी उपाययोजना म्हणून येत्या शनिवारी आणि रविवारी (दि. 9 व 10 मे) रोजी जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे सांगितले. त्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.

 

हा जनता कर्फ्यू शनिवारी (9 मे) दुपारी 12 वाजतापासून रविवारी 10 मेच्या रात्री 12 पर्यंत चालेल. या काळात केवळ रूग्णालये व औषधांची दुकाने सुरू राहतील. इतर सर्व सेवा बंद राहतील. शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी दुपारपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा 60 वर पोहोचला असून खबरदारीचा उपाय म्हणून येणाऱ्या शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यूचे नियोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधासाठी व सर्वांच्या सुरक्षिततेसाठी कर्फ्यूचे नियोजन केले आहे. त्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

 

लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यानंतर राज्य शासनाने काही क्षेत्र वगळता इतर ठिकाणी विविध सवलती लागू केल्या आहेत. मात्र, अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या पाहता येथे अद्यापपर्यंत मद्यविक्री दुकानांना परवानगी देण्यात आली नाही. त्यासाठी आधी सर्व संबंधित दुकानदारांची बैठक घेऊन त्यांना राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांचे  निर्देश, नियम आणि अटी शर्ती याबाबत अवगत करून देण्यात येईल. त्यानंतर परवानगीचा विचार करण्यात येईल.  अशा दुकानात काम करणाऱ्या व्यक्तींकरिता फिटनेस प्रमाणपत्र देणे आवश्यक राहील. यासोबतच सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग पालन व इतर आवश्यक नियम पालन करणे बंधनकारक/तरच परवानगी दिली जाईल.

 

कंटेनमेंट झोनमध्ये तेथील ये-जा करण्यासाठी काही अत्यावश्यक सेवांना पासेस दिल्या आहेत. परिसरात मर्यादित वावर असावा व जीवनावश्यक वस्तूही मिळाव्यात, असा त्याचा हेतू आहे. याशिवाय, रमझान महिना लक्षात घेता मुस्लिम बांधवांकरिता फळ घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

 

कोरोनाचा यशस्वीपणे मुकाबला करण्यासाठी सर्वांनी घरात सुरक्षित राहावे व दक्षतेचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.