ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचं निधन, ‘अनाथांची माय’ गेल्यानं लेकरं पोरकी!

0
1740
Google search engine
Google search engine

माई गेली, महाराष्ट्र पोरका झाला

महाराष्ट्राची माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे नुकतेच पुण्यात निधन झाले आहे. त्या 73 वर्षांच्या होत्या. माईंच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र पोरका झाल्याची भावना राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.
स्वतःला घरातून हाकलून दिल्यानंतर आत्महत्या करण्यासाठी बाहेर पडलेली सिंधुताई परिस्थितीवर मात करत आपल्यासारख्या पिचलेल्या महिलांची आणि अनेक अनाथ बालकांची आई झाली. माईच्या आश्रमात दीड हजारांहून अधिक मुलांनी मोकळया आभाळाखाली जगण्याचं शिक्षण घेतलं. आश्रमातील अनेक बालकांच्या पंखात बळ भरत माईने त्यांना समाजात मानाचं स्थान प्राप्त करून दिलं अनेक शासकीय उच्च पदस्थ अधिकारी यांपासून उद्योगपती पर्यंत मायेच्या पंखाखाली मुलांनी भरारी घेतली. सिंधुताईंच्या या अतुलनीय कामगिरीची दखल घेत त्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय 900 हून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत तर मानाचा पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारने देऊन त्यांना नुकताच गौरवलं होतं. माईंच्या जाण्यामुळे अवघा महाराष्ट्र पोरका झाल्याची भावना व्यक्त करून माईंच्या मोठ्या परिवाराच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त करीत एडवोकेट ठाकूर यांनी त्यांच्या मृत आत्म्याला श्रद्धांजली वाहिली आहे.