जिल्हा परिषद मधील अनागोंदी विरोधात जनसंग्रामचे उद्या धरणे आंदोलन

0
1149
Google search engine
Google search engine

जळगांव-

 

जिल्हा परिषद प्रशासनाने शालेय पोषण आहार प्रकरणात संभ्रम निर्माण करणारे व वेळ मारून नेणारे उत्तर देत जनसंग्रामने दिलेल्या इशारा निवेदनाची व त्यातील तक्रारींची दखल घेतलेली नाही. त्यामुळे पंचायतराज समितीच्या दौर्‍यादरम्यान येत्या २६ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जनसंग्रामचे अध्यक्ष श्री विवेक ठाकरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत त्यांनी स्पष्ट केले की, जळगांव जिल्ह्यातील गेल्या ८-१० वर्षातील शालेय पोषण आहार प्रकरणी झालेल्या तक्रारींचा एकत्रित घोषवारा घेऊन यामधील अनियमितता व कंत्राटदाराने प्रशासनाची केलेली दिशाभुल याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी यासाठी शासनाकडे स्वतंत्र प्रस्ताव तात्काळ पाठविण्यात यावा आणि शालेय पोषण आहार प्रकरणात २०१४ मधील मुदतबाह्य साठा जप्त केल्याप्रकरणी व यावर्षी पदाधिकार्‍यांनी स्वत: निकृष्ट धान्यादी मालाचे नमुने हस्तगत करून तपासणीसाठी दिल्यावर सुध्दा अन्न व औषध प्रशासनाने विसंगत अहवाल दिला म्हणुन या कारवाईला जिल्हा परिषद प्रशासनाने सुमोटो न्यायालयात अथवा वरिष्ठ प्राधिकरणाकडे आव्हान देण्यासाठी आवश्यक ती शिघ्र कारवाई करावी अशी १८ ऑक्टोबर रोजी तक्रार निवेदनाद्वारे मागणी केलेली असतांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी २२ ऑक्टोबर रोजी विवेक ठाकरे यांना एका पत्राद्वारे शालेय पोषण आहार प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई करण्यात येईल तसेच कायदेशीर अभिप्राय प्राप्त करण्यासाठी संपुर्ण नस्ती जिल्हा परिषद पॅनलवरील वकील अँड.मोहन देशपांडे यांच्याकडे सादर केलेली आहे. नस्ती प्राप्त होताच केलेल्या कारवाईबाबत आपणांस अवगत करण्यात येईल म्हणुन आपण याबाबत कोणत्याही प्रकारचे आंदोलन करू नये असे कळविले आहे.

जिल्हा परिषदेचे सी.ई.ओ. यांनी आम्ही १८ऑक्टोबर रोजी दिलेल्या तक्रार निवेदनातील आमच्या मागण्या विचारात घेऊन त्या संबंधी कारवाई करणे आवश्यक असतांना विसंगत,दिशाभुल करणारे व शालेय पोषण आहार प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आम्ही कोणतीही मागणी केलेली नसतांना त्यासंबंधी उहापोह करणे चुकीचे आहे म्हणुन पंचायतराज समितीच्या दौर्‍यावेळी जिल्हा परिषदेचा अनागोंदी कारभार समोर यावा यासाठी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे श्री. ठाकरे यांनी यावेळी नमुद केले.