जिल्हाधिका-यांच्या नेतृत्वातील समितीने जिल्हा सामान्य रुग्णालयाची केली पाहणी – औषधांच्या तुटवडयासाठी नियोजन करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश

0
772
Google search engine
Google search engine

चंद्रपूर

चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ( जिल्हा सामान्य रुग्णालयातील) बालमृत्यू दर कमी करणे व अन्य पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात गठीत केलेल्या चौकशी समितीने आज रुग्णालयाची आकस्मिक पाहणी करुन या ठिकाणच्या व्यवस्थेचे निरीक्षण केले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या या रुग्णालयात औषधांचा तुटवडा भासू नये. या संदर्भातील नियोजन करण्यात आले असून आता सर्व कर्मचा-यांच्या बायोमॅट्रीक उपस्थितीसाठी यंत्रणा लावण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत येणा-या जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण सेवा ही राज्यातील प्रगत रुग्ण सेवा झाली पाहिजे. यासाठी या ठिकाणच्या बालमृत्यू प्रकरणातील वस्तुस्थिती शोधून काढण्यात यावी. या ठिकाणचा मृत्यूदर शून्य आणण्यासाठी सर्व साधनसुविधांची उपलब्धता करुन देण्यात यावी. जिल्हयातील आरोग्य यंत्रणा बळकट व्हावी, तसेच महाराष्ट्रातील अद्ययावत नवे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणून चंद्रपूरला नाव लैकिक मिळावा. यासाठी सूचवायच्या उपाय योजनांसाठी ही समिती काम करणार आहे. आज जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्या नेतृत्वात जि.प.चे मुख्य कार्यकारी जितेंद्र पापळकर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूरचे प्रकल्प अधिकरी एम.आर.दयानिधी, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.उमेश नावाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्रीराम गोगुलवार, वैद्यकीय अधिक्षक डॉ.मुनघाटे, डॉ.बेंडले आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिका-यांनी बाहयरुग्ण विभाग, प्रसूती विभाग, नवजात शिशूंचा अतिदक्षता विभाग (एसएनसीयू), औषधी पुरवठा विभागात जाऊन या पथकाने प्रत्यक्ष पाहणी केली. या रुग्णालयाला औषधाचा तुटवडा भासणार नाही. यासाठी चालू आर्थिक वर्षाचे व पुढील वर्षाचे नियोजन करण्याची सूचना यावेळी जिल्हाधिका-यांनी केली. प्रसंगी स्थानिक स्तरावर यासाठी निधी उपलब्ध केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी वैद्यकीय अधिका-यांना दिले.
चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत येणा-या जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण सेवा, उपलब्ध औषधांचा पुरवठा, बाल व जेष्ठांचे अतिदक्षता विभागाची स्थिती. या ठिकाणी रात्री व दिवसा काम करणा-या वैद्यकीय अधिका-यांची उपलब्धता सामान्य नागरिकांसाठी आवश्यक असणा-या सोयी सुविधा, डॉक्टर व रुग्णांसाठी आवश्यक असणा-या सुरक्षा यंत्रणांची उपस्थिती. या परिसरातील सुरक्षा व्यवस्था, प्रलंबित बांधकाम व आदी विषयावर या समितीने वैद्यकीय महाविद्यालयाच्या वरिष्ठांशी चर्चा केली.