सांगली : आणखी सात पोलिस निलंबित

0
1446
Google search engine
Google search engine

सांगली –

अनिकेत कोथळे खूनप्रकरणी शनिवारी आणखी सात पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. त्यात ठाणे अंमलदार मिलिंद शिवाजीराव शिंदे, त्यांचे सहकारी गजानन जगन्‍नाथ व्हावळ, लॉकअप गार्डप्रमुख प्रदीप रामचंद्र जाधव, स्वरुपा संतोष पाटील, ज्योती चंद्रकांत वाजे, श्रीकांत सुरेश बुलबुले आणि वायरलेस ऑपरेटर सुभद्रा विठ्ठल साबळे यांचा समावेश आहे.

या प्रकरणात या आधी पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह पाच जणांना निलंबित करून अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील निलंबित पोलिसांची संख्या आता बारा झाली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा सीआयडी अधिकार्‍यांनी आज गतीने तपास सुरू केला. गुन्हा घडलेले ठिकाण म्हणजे शहर पोलिस ठाणे येथे भेट दिली.

संशयित आरोपी अनिकेत कोथळे याला जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्याचा तपास करीत असताना कामटेसह त्याच्या साथीदारांनी बेदम मारहाण केली. थर्ड डिग्रीचा वापर केल्याने त्यातच अनिकेतचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या मृतदेहाची जाळून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी बुधवारी युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, चालक राहुल शिंगटे यांना अटक केली होती. त्याचवेळी त्यांचे निलंबन करण्यात आले होते. दरम्यान, या सर्व प्रकारानंतर पोलिस यंत्रणा हादरली आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे आणि त्यांच्यावर कारवाई काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शनिवारी निलंबित झालेले सर्वजण अनिकेतचा ज्या रात्री मृत्यू झाला त्या दिवशी ड्युटीवर होते. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची त्यांना माहिती होती का? कोणाचा या प्रकरणात सहभाग होता की कामात हलगर्जीपणा करण्यात आला, याची चौकशी करण्यासाठी त्यांना निलंबित करण्यात आले आहे. चौकशीनंतरच त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल होणार आहेत.