४३ अंश सेल्सिअस तापमानात गौतम जवंजाळांचे उपोषण सुरू – अहवालानुसार आरोपींच्या नावाचे लावले न.प. प्रवेशव्दारावरच तोरण

0
813
Google search engine
Google search engine
घरकुल घोटाळ्यातील दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी
चांदूर रेल्वे – (शाहेजाद खान ) 
          राज्यभरात उन्हाचा पार चढलेलाच असून सर्वत्रच उन्हामुळे नागरिकांची काहिली होते आहे. यातच विदर्भात मोसमातील उच्चांक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडणं कठीण बनलं आहे. एकप्रकारे अघोषित संचारबंदी विदर्भात लागू झाली आहे. असे असतांनाही चांदूर रेल्वे शहरातील जेष्ठ नागरीक गौतम जवंजाळ हे ४३ – ४४ अंश सेल्सिअस तापमानात घरकुल घोटाळ्यातील दोषींवर फौजदारी कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रदिनापासुन थेट न.प. प्रवेशव्दारासमोरच उपोषणाला बसले आहे.
अहवालानुसार अधिकारी,पदाधिकारी आरोपींच्या नावाचे लहान-लहान बॅनर तयार करून ते न.प. प्रवेशव्दारावरच तोरणासमान बांधल्यामुळे ते लक्षवेधक ठरले आहे.
         शासनाच्या घरकुल योजनेत गरजू गोरगरिबांना हक्काचे घर प्राप्त होणे आवश्यक होते. परंतु स्थानिक नगर परीषदमध्ये या योजनेत खरे लाभार्थी पात्र ठरविण्याऐवजी अनेक अपात्र लाभार्थ्यांना अनेक वेळा कागदपत्राची योग्य छाननी न करता परस्पर लाभ दिला आहे.
सदर घरकुल घोटाळ्याला बाहेर काढण्यासाठी गौतम अण्णाजी जवंजाळ गेल्या १० वर्षापासुन सतत लढा देत आहे. घोटाळ्यातील दोषींवर फौजदारी कारवाईसाठी गौतम जवंजाळ यांनी दोन वेळा उपोषण तसेच आंदोलने केली. याबाबत पुरावे दिले, मंत्रालयातुन पत्र आले, जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र आले, अहवाल तयार झाला यावरुन भ्रष्टाचार असल्याचे सिध्द झाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालामध्ये दोषी अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, सर्व्हे एजन्सीचे नाव असून मुख्याधिकाऱ्यांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश असल्याचे जवंजाळ यांनी सांगितले. केवळ राजकीय दबावामुळे व अधिकारी, कर्मचारी यांना गुन्ह्यांमधून वाचविण्यासाठी मुख्याधिकारी फौजदारीसाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अहवालानुसारच असलेले अधिकारी, पदाधिकारी आरोपी यांच्या नावाचे लहान बॅनरवर नावे लिहून तोरणासारखे बांधले. तेच उपोषणाचे मुख्य आकर्षक ठरले आहे. असे असले तरी जवंजाळांच्या उपोषणाचे प्रकरण दिवसेंदिवस चिघळत चालले असून त्याचा तोडगा लवकरात लवकर निघने आवश्यक आहे. एवढ्या रखरखत्या उन्हातही जवंजाळ दोन दिवसांपासून मोठ्या जिद्दीने उपोषणाला बसले असून फौजदारी कारवाई झाल्याशिवाय न उठण्याचा त्यांचा निर्धार आहे. मात्र अशा जेष्ठ नागरीकाच्या उपोषणाबद्दल प्रशासन उदासीनच दिसत असल्याचे चित्र आहे.
एका नगरसेवकाच्या माध्यमातून उपोषण तोडण्याचा प्रयत्न? 
         गौतम जवंजाळ राहतात त्या नगरातील एका नगरसेवकाच्या माध्यमातून उपोषण तोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. त्या नगरसेवकासह काही अधिकारी, कर्मचारी गौतम जवंजाळ यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरच्यांना समजविण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा शहरात धडाक्यात सुरू आहे. म्हणजेच घरच्यांच्या माध्यमातून उपोषण तोडण्यासाठी या परीसरातील एक नगरसेवक सक्रीय असल्याचे चित्र दिसत आहे. असे असले तरी गौतम जवंजाळ त्या दबावतंत्राला झुगारून आपल्या मागणीवर ठाम असल्याचे समजते. त्यामुळे त्या एका नगरसेवकाप्रती नागरीकांत चिड निर्माण होत आहे.
मुख्याधिकारी पळवाट शोधण्याच्या प्रयत्नात
        मुख्याधिकारी यांना जिल्हाधिकारी यांचा अहवाल प्राप्त झालेला असून त्यामध्ये आरोपींची नावे नमुद आहे. या अहवालावरुन मुख्याधिकारी हे पॅनलवरील वकिलांचा सल्ला घेऊन थेट गुन्हे दाखल करू शकता. मात्र मुख्याधिकारी हे जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा करतो असे सांगून पळवाट शोधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे. परंतु भर उन्हात उपोषणाला बसलेले गौतम जवंजाळ यांच्या जिवाशी जबाबदारी सुध्दा मुख्यत: मुख्याधिकारी यांचीच आहे, हे विसरता कामा नये.
जिल्हाधिकारी घेणार का दखल? 
         अनेक चांगले निर्णय घेण्यात सक्षम असणारे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी या प्रकरणात लक्ष घालून मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरणे गरजेचे असल्याचे मत काही शहरवासीयांनी व्यक्त केले.  कारण त्यांच्याच बेजबाबदारपणामुळे सदर प्रकरण चिघळले आहे.  त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेणे महत्वाचे आहे.