टोमॅटोने खिसा कापला – पेट्रोलपेक्षा टोमॅटो महाग

0
737
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )-

जेवण रुचकर बनवणाऱ्या टोमॅटोने ग्राहकांचा खिसा कापला आहे. शहरातील आठवडी बाजारात टोमॅटोचा भाव ठोकमध्ये ५० ते ६० रुपये किलोपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे किरकोळ बाजारात हा भाव ८० ते १०० रुपये किलोच्या घरात गेला आहे.

टोमॅटो आणि कोथिंबीरचे भाव गगनाला भिडल्यामुळे प्रत्येक घरातील गृहखात्याचे बजेट कोलमडले आहे. टोमॅटो, कोथिंबिरचे दर चांगलेच कडाडल्यामुळे स्वयंपाकघरातून ते आऊट झाले आहे. रोजच्या जेवणात चवीकरीता भाजी व चटणीत टोमॅटो हमखास असतात. मात्र आता टोमॅटोचे दर वाढल्यामुळे जेवणातील चव कमी झाली आहे. आठवड्याभरापूर्वीच ४० ते ५० रुपये किलोने मिळणारा टोमॅटोने आता सेंच्युरी गाठली आहे. शंभरी गाठल्यामुळे आता टोमॅटो पेट्रोलपेक्षा महाग असल्याची सर्वत्र चर्चा आहे. नाशिकमधून टोमॅटोची आवक होत आहे. मात्र इतर ठिकाणांहून आवक अचानक कमी झाली. यामुळेच टोमॅटोचे दर कडाडले आहे. बाजारात ५० ते ६० रुपये घाऊक भाव असला तरी किरकोळ विक्रेते दुपटीने विक्री करीत आहेत. मागील काही दिवसांपासून टोमॅटो व इतर काही भाजीपाल्याची आवक कमी झाली असून, परिणामी बाजारभाव प्रचंड वाढले आहेत.

कोथिंबीरचे ‘दुहेरी शतक’ :

गावरानी कोथिंबीरचे भाव १६० ते १८० रुपये किलो आहे. किरकोळमध्ये २५० रुपये किलोपर्यंत विक्री सुरू आहे. उन्हाळ्यात लागवड केलेला माल संपत आल्यामुळे व नवीन पीक आले नसल्याने, भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. भाजीपाल्यांची आवक कमी होऊ लागली असून, बाजारभाव प्रचंड वाढले आहेत. किरकोळ बाजारामध्ये अनेक भाज्यांचे दर वाढल्याने किचनचे बजेट दुप्पट झाले आहे.