भाजपा सरकारकडून राज्यातील रेशनचा ७० टक्के साखर पुरवठा बंद – श्री अनिल देशमुख

0
713
Google search engine
Google search engine

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) –

 

राज्यातील गोरगरिब जनतेला रेशन दुकानातुन मिळणाऱ्या साखरेचा ७० टक्के पुरवठा भाजपा सरकारकडून बंद करण्यात आला असून यापुढे केवळ अंत्योदय कार्ड धारकांनाच साखर मिळू शकणार आहे. परंतु यात देखील सरकारने मापात माप केले असून अंत्योदय कार्ड धारकांना प्रति कार्ड केवळ एक किलोच साखर दिली जाणार आहे. त्यामुळे गोरगरिब जनतेच्या ताटातील गोडवा हिरावणारे भाजप सरकार हे गरिब विरोधी असल्याचा आरोप राज्याचे माजी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले आघाडी सरकारच्या काळात राज्यातील गरीब जनतेला स्वस्त दरात धान्य मिळावे यासाठी सुरु केलेल्या अनेक योजना बंद करण्याचा सपाटा भाजपा सरकारने लावला आहे. मी जेव्हा राज्याचा अन्न नागरी पुरवठा मंत्री होतो त्यावेळी बीपीएल, अंत्योदय सोबतच केसरी कार्ड धारकांना देखील गहु, तांदुळ तसेच साखरेचे वाटप करण्यात येते होते. या सरकारने सत्तेत येताच डिसेंबर २०१४ पासुन केसरी रेशन कार्डवरील सर्व धान्य हे बंद केले. यामुळे राज्यातील हजारो कुटुंबियांना याचा फटका बसला आहे. इतक्यावरच हा प्रकार थांबला नाही तर बीपीएल व अंत्योदय कार्ड धारकांना प्रती व्यक्ती १३.५० रुपये भावाने अर्धा किलो साखर देण्यात येत होती, याचा फायदा राज्यातील हजारो कुटुंबीय घेत होते. सुरुवातीला केसरी कार्डवरील धान्य बंद केल्यानंतर सरकारने प्रती व्यक्ती अर्धा किलो देण्यात येणाऱ्या सारखेचा पुरवठा बंद करुन तो प्रती कार्ड एक किलोवर आणला आणि आता तर केवळ अंत्योदय कार्ड धारकांनाच प्रती कार्ड एक किलो साखर देण्यात येणार आहे. तसेच सुरुवातीला साखरेचा भाव हा १३.५० रुपये किलो होता, आता तो २० रुपये प्रती किलो करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील हजारो कुटुंबियाच्या ताटातीच साखरच या सरकारने गायब केली आहे. एकटया नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर अगोदर प्रती महिना ३ हजार १३५ क्विंटल साखरेचा नागपूर जिल्हयाला पुरवठा करण्यात येत होता. यात कपात करुन तो पुरवठा हा प्रति महिना ६९३ क्विंटल करण्यात आला आहे. तब्बल २ हजार ४४२ क्विंटल साखरेचा कोटा एकट्या नागपूर जिल्हयाचा कमी करण्यात आला आहे. हीच परिस्थिती राज्यातील इतर जिल्हयात असून संपुर्ण राज्यातील जवळपास ७० टक्के साखरेचा कोटा हा कमी करण्यात आला असून गोरगरिब जनतेच्या ताटातील गोडवा हिरावण्याचे काम केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकार करीत असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.