शहरावर तिस-या डोळ्याची नजर – शहरातील 14 मोक्याच्या ठिकाणी कॅमेरे 

0
490
Google search engine
Google search engine

*48 सीसीटीव्ही कॅमे-याच्‍या माध्यमातून गुन्हेगारांवर लक्ष
* वाहतूक नियंत्रण व अवैध वाहतुक रोखण्यासाठी मदतगार
* खुनाच्या गुन्ह्यात आरोपीला शोधण्यासाठी झाली मदत
* 9 महिला सांभाळतात नियंत्रण कक्ष

 


वर्धा- शहराची सुरक्षितता व सुव्यवस्थेचे गुणात्मकरित्या व्यवस्थापन करण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेराचा प्रभावी उपयोग जगभरात केला जात आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासन मुंबई शहरासोबतच इतर शहरांमध्येही सीसीटीव्ही लावण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवित आहे. वर्धा शहरातही 48 सी सी टी व्ही कॅमेराच्या माध्यमातून शहरातील बारीक सारीक हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
शहरात 14 मोक्याच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेराच्या थेट प्रक्षेपणामुळे पोलिसांना शहरात कायदा व सुव्यवस्थेसोबतच घडलेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी व्हिडिओ फुटेज प्राप्त होत आहे. त्यामुळे गुन्हगाराचा शोध घेण्यास आणि गुन्ह्याच्या पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी याचा चांगला उपयोग होत आहे. त्याचबरोबर शहरातील वाहतूक व्यवस्था नियंत्रणासाठी सुद्धा त्याचा उपयोग होत असून शहरात घडणाऱ्या गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा सीसी टीव्ही कॅमेरा पोलिसांचा तिसरा डोळा बनला आहे. आतापर्यंत 8 गुन्ह्याच्या प्रकरणात याची मदत झाली असून त्यातील एक खुनाच्या प्रकरणातील आरोपी ओळखण्यासाठी उपयुक्त ठरला आहे. सीसीटीव्ही कॅमेराच्या धाकामुळे गुन्हगारी कारवायां निश्चितच कमी होतील
शहरातील सीसीटीव्ही कॅमेराद्वारे झालेले चित्रीकरण पाहणे, त्याचे विश्लेषण करणे आणि आवश्यक तिथे सूचना देऊन शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात सीसीटीव्ही सर्व्हेलन्स नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा नियंत्रण कक्ष 9 महिला पोलीस कर्मचारी सांभाळत असून त्याचे केंद्र प्रमुख म्हणून पोलीस निरीक्षक सांभाळत आहेत. या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून शहरातील विस्कळीत वाहतूक सुरळीत करण्यासाठी सार्वजनिक घोषणा प्रणाली (public announcment system) चे माध्यमातून नागरिकांना सूचना देणे व मार्गदर्शन करून शांतता राखण्याबाबत सूचित करणे, अफवाना आळा घालणे ही कामे सुद्धा करण्यात येत आहेत. या नियंत्रण कक्षातून वर्धा शहरातील घडामोडींवर लक्ष ठेवणे सहज शक्य होत असून अवैध वाहतूक, चौकातील मारामारी तसेच पार्किंग समस्येवर वेळीच आळा बसून अपघात टाळण्यासाठी सुद्धा मदतगार ठरतआहे

या कक्षाचा संपूर्ण वर्धा शहराला सुरक्षा देण्यासाठी कसा उपयोग होऊ शकतो यासाठी जिल्हाधिकारी यांनी आज बैठक घेऊन नियंत्रण कक्षाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत पोलीस अधीक्षक निर्माला देवी एस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, मुख्याधिकारी आश्विनी वाघमळे, कार्यकारी अभियंता शरद चौधरी, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आणि कंट्रोल रूम इंचार्ज उपस्थित होते.
वर्धा शहरानंतर आता हिंगणघाट शहरातही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असून नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. हिंगणघाट शहरातील विविध वर्दळीच्या चौक, शहरात येणारे मुख्य रस्ते, तसेच महामार्गावरील विविध ठिकाणी हे कॅमेरे लावण्यात येतील.