बुरूंगले कनिष्ठ महाविद्यालयचा नीलकृष्ण भारतात पहिला

0
182
Google search engine
Google search engine

शेगाव:- ज्ञानेश्वर मस्कुजी बुरूंगले कनिष्ठ महाविद्यालय शेगांवचा नीलकृष्ण निर्मलकुमार गजरे याने जेईई मेन्स परीक्षेत ३०० पैकी ३०० गुण मिळवून संपूर्ण भारतात पहिला क्रमांक मिळविला आहे. ‘असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे ‘ अभ्यास, जिद्द, चिकाटी, मेहनतीने असाध्य बाबी साध्य होऊ शकतात हे नीलकृष्णने दाखवून दिले आहे. लहानपणापासूनच त्याला अभ्यास नि वाचनाची आवड होती. यामुळेच तो इयत्ता चवथीत शिष्यवृत्तीची परीक्षा पास झाला. माध्यमिक शिक्षण घेतांना एम. टी. एस. शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला. इयत्ता नववीतच दहावीचा संपूर्ण अभ्यास करून दहावीत नेत्रदीपक यश मिळविले. आणि जेईई मेन्स परीक्षेत तर संपूर्ण भारतातून पहिला क्रमांक पटकावून विविध स्पर्धेत नेहमी अग्रेसर असलेल्या बुरूंगले कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या भव्यदिव्य यशाने बुरूंगले कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव देशाच्या कानाकोप-यात पोहचले आहे.
नीलकृष्ण हा चिकित्सक, विज्ञानवादी दृष्टीचा, उच्च ध्येय बाळगणारा विद्यार्थी आहे. आयुष्यात त्याला भौतिकशास्त्रात संशोधन करून जागतिक पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करावयाचे आहे.
या घवघवीत यशाबद्दल संस्थाध्यक्ष रामविजय उपाख्य बापूसाहेब बुरूंगले यांनी नीलकृष्णचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तद्वतच प्राचार्या मीनाक्षीताई बुरूंगले, पर्यवेक्षक शिवाजी निळे, सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले.

आई-वडिलांचा आशीर्वाद आणि बुरूंगले कनिष्ठ महाविद्यालयाची शिस्त, ज्ञानमय वातावरण, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दिली जाणारी प्रेरणा, तज्ज्ञ मार्गदर्शन व या महाविद्यालयातील दर्जेदार शिक्षणाचे हे परिपाक आहे. असे नीलकृष्ण मानतो.