​सेवानिवृत्तीप्रसंगी श्री डी.डी. पाटील यांचा कुलगुरुंच्या हस्ते सत्कार

0
1086
Google search engine
Google search engine

अमरावती- 

    विद्यापीठाच्या वित्त विभागात कार्यरत श्री दिलीप पाटील यांचा सेवानिवृत्तीप्रसंगी कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून विद्यापीठाच्यावतीने सत्कार केला तर सौ. पाटील यांचा साडीचोळी देवून वित्त विभागातील सौ. प्रज्ञा बोंडे यांनी सत्कार केला.  व्यासपीठावर याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक तथा व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.डी.एन. शिंगाडे, कुलसचिव डॉ. अजय देशमुख, वित्त व लेखा अधिकारी डॉ. शशीकांत आस्वले, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री अजय देशमुख, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, श्री दिलीप पाटील व सौ. पाटील उपस्थित होते.

    सत्कारप्रसंगी कुलगुरु म्हणाले, विद्यापीठातून दर महिन्याला कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे.  त्यामुळे अनुभवी व गुणी कर्मचायांची पोकळी निर्माण होत आहे.  श्री डी.डी. पाटील हे अतिशय प्रतिकुल परिस्थितीत संघर्षमय जीवन जगले आहेत.  इतिहासात जी माणसे मोठी झालीत, त्यांचं जीवन प्रतिकुल परिस्थितीतूनच गेलं आहे.  मनुष्याला प्रतिकुल परिस्थितीतूनच ताकद प्राप्त होते.  श्री डी.डी. पाटील यांच्यासारखी शुन्यातून विद्यापीठ उभी करणारी माणसं या विद्यापीठाला लाभली आहेत.  येथील कर्मचायांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत विद्यापीठाला यशोशिखरावर नेण्याचं लक्ष पूर्ण केलं आहे आणि तो प्रवास निरंतर सुरु आहे.  कर्मचारी कमी असले तरी सर्वांनी आपली शक्ती अधिक वाढवून प्रतिकुलतेवर मात करण्याच्या मिळालेल्या संधीचे सोने करण्याची हीच वेळ आहे.

    अनुकुलतेत यशाचा जो आनंद मिळतो, त्यापेक्षा जास्त प्रतिकुलतेत मिळतो, असे सांगून कुलगुरु पुढे म्हणाले, विद्यापीठातील सर्वांनी आपण संख्येने कमी आहोत, याकडे लक्ष न देता विद्यापीठाचा केंद्रबिंदू विद्यार्थी याला जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करण्याचे आव्हान स्वीकारावे, असेही त्यांनी अधोरेखीत केले.

    डॉ.डी.एन. शिंगाडे म्हणाले, श्री पाटील यांनी अतिशय निष्ठेने व प्रामाणिकपणे, सचोटी, कसोटी व हातोटीचा वापर करुन सेवाकाळात उत्कृष्टपणे कार्य केले आहे.  परिश्रमी असलेले श्री पाटील यांच्या सेवानिवृत्तीमुळे त्यांच्या कार्याची व अनुभवाची कमतरता विद्यापीठाला भासेल; यावर भाष्य केले.

    मनोगतातून श्री दिलीप पाटील यांनी संघर्षमय जीवनातून शिक्षण, नोकरी व खडतर प्रवास यावर कथन केले.  नोकरीच्या सुरुवातीला आलेले कठोर अनुभव त्यांनी सांगितले.  सेवाकाळात वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे प्रामाणिकपणे व अधिक जबाबदारीने काम करता आले.  सेवेतून जरी सेवानिवृत्त होत असलो; तरी दिलेल्या सेवेबद्दल समाधानी असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

    विद्यापीठ गीताने सुरु झालेल्या कार्यक्रमात कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी प्रास्ताविक भाषण करुन पाहुण्यांचे शब्दसुमनाने स्वागत केले व श्री दिलीप पाटील यांना रजारोखीकरणाचा धनादेश प्रदान केला.  वित्त व लेखा अधिकारी डॉ. शशीकांत आस्वले यांनी नियंत्रण अधिकारी म्हणून भूमिका मांडली.  महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष जळगाव विद्यापीठातील श्री रमेश शिंदे यांनी पुस्तक देवून महासंघातर्फे श्री दिलीप पाटील यांचा सत्कार केला.  विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री दिपक काळे यांनी पतसंस्थेतर्फे उभयतांचा सत्कार करुन कल्याण व भागभांडवल राशीचा धनादेश प्रदान केला.  संचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी तर आभार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री अजय देशमुख यांनी मानले.  कार्यक्रमाला माजी परीक्षा नियंत्रक डॉ.भि.र. वाघमारे, माजी उपकुलसचिव श्री वि.गो. राठी, जोशी ब्रादर्सचे संचालक श्री राम जोशी, महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष श्री रमेश शिंदे यांचेसह विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी मोठसंख्येने उपस्थित होते.