सायकल चालवणे ही एक चळवळ बनावी : खासदार श्री संजय राऊत

0
903
Google search engine
Google search engine

 

नवी दिल्ली –

 

सायकल हे प्रदूषण मुक्त प्रवासाचे जगातले सर्वोत्तम माध्यम आहे. जगभरातल्या जवळपास चौदा देशांत राष्ट्रप्रमुखांसह लोकप्रतिनिधी आणि मान्यवर मंडळी सायकलने प्रवास करतात. आपल्या देशातही सायकल चालवणे चळवळ बनली पाहिजे, असे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रात केले.
अकोला जिल्हा निसर्ग संवर्धन परिषद व सायकल मित्र परिवाराच्या सदस्यांचा आज महाराष्ट्र परिचय केंद्रात सत्कार व अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी श्री. संजय राऊत आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांच्या हस्ते या चमूचे प्रमुख गजानन खेंडकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. अकोला ते दिल्ली असा सायकल ने ४२ दिवसांचा प्रवास करत निसर्ग संवर्धनाचा संदेश देणा-या सायकल स्वारांच्या चमूच्या उपक्रमाचे खासदार संजय राऊत यांनी कौतूक केले. डेन्मार्कसह जगातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये विमानतळावर सायकलसाठी पार्किंग आहेत, असे सांगत खा. राऊत यांनी या सायकलस्वारांना शुभेच्छा दिल्या.

दैनंदिन व्यवहारात सर्वसामान्य व्यक्ती व विशेषत: विद्यार्थ्यांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे कमी झालेले व्यायामाचे महत्च अधोरेखित करून सायकल चालवून आरोग्य संपन्न जीवन जगण्याचा संदेश या चमूने दिला आहे. सायकल चालविल्याने प्रदूषणाला आळा बसेल आणि पर्यायाने वाहनांसाठी लागणा-या इंधनाची बचत होईल, असा संदेश देत या सायकल स्वारांच्या चमूने महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यातून प्रवास केला आहे. अकोल्यातून गजानन खेंडकर हे आपल्या साथीदारांसह १४०० किमीचे अंतर ४२ दिवसांत पार करत दिनांक २ ऑगस्ट २०१७ ला दिल्लीत पोचले. या प्रवासांत अनेक ठिकाणी चांगले वाईट अनुभव आले. ऐके ठिकाणी तर एक विद्यार्थी पाण्यात जवळपास बुडालाच होता त्याला वाचविल्याचा हदयस्पर्शी अनुभव खेंडकर यांनी सांगितला. प्रवासात अनेक ठिकाणी शीख बांधवांच्या गुरूद्वारामध्ये उत्तम राहण्याची व जेवणाची सोय झाली. शीख बांधवांनी केलेल्या आदरातिथ्याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
या चमुमध्ये गजानन खेंडकर, ज्ञानदेव जगदाळे या दोन शिक्षकांसह कृष्णा पवार, गणेश पवार, हर्षदीप वानखेडे, तरूण वानखेडे, दीपक शिंदे, निशांत पवार या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दिल्लीत प्रधानमंत्री कार्यालय व राष्ट्रपती कार्यालयाला निवेदन देऊन सायकल ला राष्ट्रीय वाहनाचा दर्जा मिळावा अशी मागणी या चमुच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे गजानन खेंडकर यांनी सांगितले. यापूर्वी त्यांनी सायकल हे राष्ट्रीय वाहन व्हावे यासाठी देशभरातील सर्वच मुख्यमंत्री व राज्यपालांना व मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे.
गजानन खेंडकर यांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे सायकलीचे महत्व विषद करणारा, ‘सायकल म्हणते मी आहे ना..’ हा धडा राज्यात पाठयपुस्तकात सहावीच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. हाच धडा देशातील सर्वच प्रादेशिक भाषांमध्ये असावा जेणेकरून सायकली च्या चळवळीला चालना मिळेल, अशी अपेक्षाही खेंडकर यांनी बोलून दाखविली.
उपसंचालक दयानंद कांबळे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात या चमुच्या कार्याचे कौतूक करून सायकल रॅलीच्या माध्यमातून जैविक विविधतेतील समतोल राखण्याचा संदेशही पोहचविण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा आणि माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांनी या चमूतील सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उपसंपादक रितेश भुयार यांनी सूत्र संचालन केले. यावेळी दैनिक सामनाचे दिल्ली ब्युरो चिफ निलेश कुलकर्णी उपस्थित होते.