​व्यावसायिक प्रशिक्षण घेवून जीवन उज्वल करावे — जिल्हाधिकारी

0
518
Google search engine
Google search engine

• कारागृह म्हणजे सुधारगृह

•  कैदयांसाठी 10 दिवसीय व्यवसाय प्रशिक्षण 

• लोकराज्य अंकाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन


भंडारा :- 

 जिल्हा कारागृहातील 70 टक्के कैदी हे 20 ते 25 वयोगटातील आहेत. आयुष्य उभारण्याच्या काळात काही चुका, राग व मोहापायी या कैदयांकडून असे गुन्हे घडले आहेत. भावनेच्या भरात असे कृत्य अनेकदा होतात,मुद्दाम कुणी असे कृत्य करत नाही. आधुनिक जगात तुरुगाच्या संकल्पना बदलल्या आहे. तुरुंग म्हणजे सुधारगृह झाले आहे. कैदयात सुधार घडविण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत हे व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येत आहे. या चांगल्या संधीचा लाभ घेवून जीवन उज्वल करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले. 

जिल्हाधिकारी यांच्या पुढाकाराने स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा कारागृह व जिल्हा उद्योग केंद्राच्या संयुक्त विद्यमाने कैदयांसाठी विशेष व्यवसाय प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा कारागृहात करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या वेळी कारागृह अधिक्षक अ.म. कुमरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक  आर.एस. खांडेकर, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक संदिप देवगीरकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक मदन खडसे, स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे  संचालक एन. वाय. सोनकुसरे, ॲड. सुनिता जैन, सुनिलदत्त जांभूळे, बंडुसिंग राठोड उपस्थित होते. 

यावेळी  जिल्हा माहिती कार्यालयातर्फे शासनाचे मुखपत्र लोकराज्य मासिकाच्या ऑगस्ट महिन्याच्या अंकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या हस्ते करण्यात आहे. 

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, व्यावसायिक प्रशिक्षण दहा दिवसाचे असून कैदयांना टप्प्याटप्प्याने हे देण्यात येणार आहे. यामध्ये अगरबती तयार करणे, मेनबत्ती तयार करणे, खडू तयार करणे, कापूर तयार करणे असे अनेक उद्योग प्रशिक्षणाचा यात समावेश आहे. कैदयांनी तयार केलेल्या वस्तु बाहेर विकल्या जातील व त्यातून त्यांना रोजगार मिळेल. या चांगल्या संधीचा फायदा घ्या व दुसऱ्यांना शिकवा, असे मार्गदर्शनपर सूचना त्यांनी दिल्या.

कारागृहात रिकामे राहण्यापेक्षा वेळेचा उपयोग रोजगार करण्यासाठी  हे प्रशिक्षण आहे.  या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्या, असे जिल्हाधिकारी म्हणाले. काही संस्थांशी संपर्क साधून कैदयांसाठी शिक्षण व मनशांतीचे उपक्रम  सुध्दा राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न करा, चुक सुधारा व प्रशिक्षणाचा फायदा घेवून आपला रोजगार उभारा. स्वत:चा रोजगार उभारुन नवीन जीवनास सुरु करा, असे ते म्हणाले. कारागृहातील स्वच्छतेबद्दल त्यांनी कैदयांचे अभिनंदन केले.

कारागृह अधिक्षक कुमरे म्हणाले की, कैदयांनी या 10 दिवसीय प्रशिक्षण एकरुप होऊन घ्यावे. केलेल्या गुन्हाचे प्रायश्चित म्हणून येथे येतो. परंतु येथून निघाल्यावर या प्रशिक्षणाचा फायदा घेवून आपला रोजगार करावा. वाईट गुणांचा त्याग करुन रोजगारातून आर्थिक विकास करावा व चांगले जीवन जगावे. 

प्रास्ताविकात सोनकुसरे यांनी या प्रशिक्षणाचा इतिहास सांगतांना म्हणाले की,  प्रशिक्षणाची सुरवात कर्नाटक राज्यातील गुजेर या गावी विरेंद्र हेगडे यांनी स्वत:च्या खर्चाने सुरुवात केली.  त्याचे रुपांतर आज देशभरात हे प्रशिक्षण मोफत देण्यात येत आहे. देशभरातील बेरोजगारीवर आळा बसावा, यासाठी हे प्रशिक्षण असून कैदयांनी याचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. सन 2010 पासून सुरु झालेल्या या स्वयंरोजगार प्रशिक्षात जिल्हयात 2 हजार 800 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले. त्यातील 1 हजार 892 प्रशिक्षणार्थींना रोजगार उपलब्ध झाले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मदन खडसे यांनीही मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमाचे संचालन स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे  संचालक एन. वाय. सोनकुसरे यांनी केले तर आभार  अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आर.एस. खांडेकर यांनी मानले.

या प्रशिक्षणास कारागृहातील 500च्यावर कैदी उपस्थित होते.