अल्पसंख्याकांच्या न्याय्य हक्कांसाठी काम करेन – सुलेखा कुंभारे

0
690
Google search engine
Google search engine


मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – राज्याच्या माजी राज्यमंत्री अॅड सुलेखा कुंभारे यांनी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यपदाचा पदभार स्वीकारला. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले.


यावेळी अॅड सुलेखा कुंभारे म्हणाल्या की, अल्पसंख्याक आयोग देशातील बौद्ध, शीख, मुस्लिम, पारशी, जैन आदी अल्पसंख्याक समाजांतील लोकांसाठी काम करतो. आयोगाचे अध्यक्ष गैरुल हसन रिझवी यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यांची टीम कार्य करणार आहे. अल्पसंख्याक समाजातील उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच चांगले सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक वातावरण निर्माण करण्यावर भर असणार असल्याचे त्या म्हणाल्या. आयोगाचे पदाधिकारी सामाजिक क्षेत्रातील असल्यामुळे त्यांना समाजातील समस्यांची चांगली जाणीव असते. त्यामुळे आयोग अधिक सक्षमपणे काम करेल. आम्ही अल्पसंख्याक जनता व सरकार यांच्यामध्ये सेतू बांधण्याचे काम करू, असेही कुंभारे म्हणाल्या. सदस्यपदाचा कारभार स्वीकारताना वडिलांची आठवण होत असल्याचे कुंभारे यांनी सांगितले. ‘१९७२ ते १९७८ या काळात वडील खासदार असताना २0२, साऊथ अँव्हेन्यू या शासकीय निवासस्थानी आम्ही यायचो. आजही त्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. आयोगाचे सदस्य म्हणून काम करताना वडिलांकडून मिळालेल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा मोठा फायदा होणार,’ असेही त्या म्हणाल्या.