चांदुर रेल्वे शहरात ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा – प्रा. डॉ. प्रमोद गारोडे यांचा सत्कार

0
931
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे (शहेजाद खान ) –

 

मानवी जीवनातील बालपण व तरुणपणाचे वय निघुन गेल्यानंतर वृद्धत्वाकडे वाटचाल करतांना वयाच्या 60 वर्षानंतर ज्येष्ठ नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याचाच विचार करून शासनाने 1999 साली जेष्ठ नागरिकांसाठीचे राष्ट्रीय धोरण जाहीर करून 1 ऑक्टोबर रोजी जेष्ठ नागरीक दिन साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून या दिवशी ज्येष्ठ नागरिक दिन देशभरात साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने स्थानिक वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने गांधी चौकातील महावीर भवन, जैन मंदिरात सकाळी 11 वाजता जेष्ठ नागरिक दिनाचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. श्रीकृष्ण रेचे होते तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा. प्रभाकर वाघ, प्रसिद्ध व्यापारी शांतीलाल बागमार,  प्रा. वासुदेवराव वातकर, डॉ. पंजाबराव मेटे, सुमेरचंद जैन, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उत्तमरावजी गावंडे, कविवर्य प्रा. डॉ. प्रमोद गारोडे मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या फोटोचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात येऊन मान्यवरांचे पुष्पहाराने स्वागत करण्यात आले. यानंतर ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य श्री. वसंतराव गहूकार, रमेशराव घिके, नारायणराव देशमुख, भिमरावजी वाघ,  बबनराव जिरापुरे, श्रीमती पार्वताबाई खेतानसह जेष्ठ महिला रुख्माबाई शेंद्रे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार तर महिलांना साडी-लुगडे, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शहरातील प्रतिभावंत व्यक्ती कविवर्य प्रा. डॉ. प्रमोद गारोडे यांचासुद्धा यथोचित सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना प्रमोद गारोडे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी व त्यावर व त्यावरील उपायांचे मार्मिक विवेचन केले. यानंतर प्रा. प्रभाकर वाघ, शांतीलाल बागमार,  प्रा. वासुदेवराव वातकर, डॉ. पंजाबराव मेटे, सुमेरचंद जैन यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर अध्यक्षीय भाषणात श्रीकृष्णराव रेचे यांनी भारतात 14 कोटी ज्येष्ठ नागरिक असूनही त्यांच्यासाठी शासनाकडून भरीव कार्य होत नसल्याची खंत व्यक्त केली व नागरिकांच्या मदतीसाठी शासनाने अजून कार्य करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य विश्वास दामले यांनी तर आभार प्रदर्शन दत्तात्रय भोयर यांनी केले. शिवाय या कार्यक्रमासाठी मोफत जैन मंदिर सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल सचिन जयस्वाल यांचे आभार ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उत्तमराव गावंडे यांनी मानले. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांसह तालुक्यातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.