सनातन संस्थेला गोवण्याचे षड्यंत्र उघड ! – श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

0
603
Google search engine
Google search engine

मुंबई – गौरी लंकेश हत्येप्रकरणी विशेष अन्वेषण पथकाचे प्रमुख पोलीस महानिरीक्षक बी.के. सिंह यांनी १४ ऑक्टोबरला बेंगळुरू येथे पत्रकार परिषदेत घेतली. त्यात त्यांनी ‘गौरी लंकेश हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा सहभाग असल्याची माहिती केवळ प्रसिद्धीमाध्यमांमध्ये आहे. आमच्याकडे अद्याप कोणत्याही संस्थेविषयी कोणतीही माहिती नाही’, असा खुलासा केला.

या खुलाशानंतर हिंदुविरोधक, तसेच काही प्रसिद्धीमाध्यमे जाणीवपूर्वक या प्रकरणात सनातन संस्थेला गोवण्याचा अन् संस्थेची अपकिर्ती करण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट होते, अशी प्रतिक्रिया सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केली.

या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, आम्ही प्रथम विशेष अन्वेषण पथकाचे अभिनंदन करतो की, त्यांनी कोणत्याही दबावाखाली न येता सत्य बाजू मांडली. कोणताही पुरावा नसतांना आणि सनातन संस्थेने खुलासा करूनही हिंदूविरोधक आणि काही प्रसिद्धीमाध्यमे पहिल्या दिवसापासून सनातनचा संबंध गौरी लंकेश हत्येशी जोडत होते. समाजात सनातनची प्रतिमा जाणीवपूर्वक मलीन करण्यात आली. या प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सनातन संस्था अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे.

प्रत्यक्षात गौरी लंकेश हत्या प्रकरणी केवळ हिंदु संघटनांवर आरोप न करता, विशेष अन्वेषण पथकाला नि:पक्षपातीपणे तपास करू दिला पाहिजे. गौरी यांच्या हत्येमागे काही आर्थिक घोटाळा किंवा नक्षलवादी संबंध तर नाहीत ना, अशा विविध अंगांनी अन्वेषण व्हायला हवे. महाराष्ट्रात डॉ. दाभोलकर यांच्या ट्रस्टमधील घोटाळे उघड झाले असून त्यांची चौकशी चालू आहे. तसेच कॉ. पानसरे यांच्या सहकारी संस्थेत कम्युनिस्ट पक्षाचे अनधिकृत ४५ लाख रुपये असल्याचे उघड झाले आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर निघणारे मोठमोठे मोर्चे कोण प्रायोजित करत आहेत, याचीही चौकशी व्हायला हवी.