गौरी लंकेश हत्या प्रकरण – केवळ माध्यमांकडूनच सनातन संस्थेचे नाव घेतले जात असल्याचे सूतोवाच<><>कोणत्याही संघटनेच्या सहभागाविषयी कोणतीही माहिती नाही ! – विशेष अन्वेषण पथक

0
573
Google search engine
Google search engine

 

 

बेंगळुरू – पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात सनातन संस्थेचे नाव केवळ माध्यमांकडूनच घेतले जात आहे. आमच्याकडे कोणत्याही संघटनेच्या (सनातन संस्थेच्या) सहभागाविषयी कोणतीही माहिती नाही, अशी माहिती या हत्या प्रकरणात नेमण्यात आलेल्या विशेष अन्वेषण पथकाचे (एस्आयटीचे) प्रमुख बी.के. सिंह यांनी दिली.

या वेळी सिंह यांनी तीन जणांची रेखाचित्रे प्रसिद्ध करून लोकांना साहाय्य करण्याचे आवाहन केले. या प्रकरणी अन्वेषण पथकाकडे असलेला ‘व्हिडिओ’ही त्यांनी प्रसारित केला.

सिंह पुढे म्हणाले, ‘‘गौरी लंकेश हत्या प्रकरणात आतापर्यंत २०० ते २५० जणांची चौकशी करण्यात आली आहे. अद्याप अन्वेषण चालू असून गुन्हेगारांना लवकरच जेरबंद केले जाईल. मारेकरी हत्येच्या एक आठवड्यापूर्वी बेंगळुरूमध्येच वास्तव्यास होते. या घटनेचा महाराष्ट्रातील डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येच्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.

आम्ही प्रसिद्ध केलेल्या ३ रेखाचित्रांपैकी २ रेखाचित्रांच्या संदर्भात बर्‍यापैकी साम्य दिसून येते. प्राप्त माहितीनुसार ही रेखाचित्रे सिद्ध करण्यात आली आहेत. त्यातील व्यक्तींच्या पेहरावावरून ते कोणत्या धर्माचे आहेत, हे सांगता येणार नाही. फसवण्यासाठीही गुन्हेगार कपाळावर टिळा लावू शकतात. गौरी लंकेश या एक पत्रकार आणि कार्यकर्त्या होत्या. आम्ही ‘ही हत्या व्यावसायिक कारणामुळे झाली नाही’, एवढेच आतापर्यंत सांगितले आहे.’’