सहकार चळवळ मजबूत करा – सुभाष देशमुख <><> पंडीत दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी निमित्त सहकार परिषद

0
999
Google search engine
Google search engine

गोंदिया :-

 

शेवटच्या घटकातील माणूस आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला पाहिजे. तसेच गावातील शेतकरी सुध्दा समृध्द होण्यासाठी सहकार चळवळ मजबूत करण्याची आज नितांत गरज आहे. असे प्रतिपादन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
26 ऑक्टोबर रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व ग्रामीण सहकार भारती प्रकोष्ठ महाराष्ट्र यांच्या संयुक्त वतीने पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने अटल महापणन विकास अभियानाअंतर्गत मयूर लॉन कटंगीकला येथे आयोजित सहकारी संस्थांची कार्यशाळा व सहकार परिषदेचे उदघाटक म्हणून श्री.देशमुख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजकुमार बडोले होते. प्रमुख अतिथी म्हणून राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, आमदार डॉ.अनिल बोंडे, राज्य सहकार भारती प्रकोष्ठचे अध्यक्ष डॉ.मुकूंदराव तापकीर, माजी आमदार हेमंत पटले, केशवराव मानकर, भैरसिंह नागपूरे, भजनदास वैद्य, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, रजनी नागपूरे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, राज्य पत संस्था फेडरेशनचे उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव, नगराध्यक्ष अशोक इंगळे, भंडारा अर्बन बँकेचे अध्यक्ष महेश जैन, जि.प.सभापती छाया दसरे, मजूर सहकारी संस्थेचे अध्यक्ष सचिन मिश्रा उपस्थित होते.
श्री.देशमुख पुढे म्हणाले, महाराष्ट्र समृध्द होण्यासाठी सहकारी संस्थांचे बळकटीकरण करणे गरजेचे आहे. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी सहकार चळवळ बळकट करण्यासाठी गावातील शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्याची आवश्यकता आहे. विविध कार्यकारी संस्थांनी गावातील बेरोजगार तरुणांना काम देण्याचे प्रयत्न करावे. आपल्या सोसायटीचे काय वैशिष्ट्य आहे हे आपल्याला समजावून सांगता आले पाहिजे. ज्या होतकरु गरजू तरुणांना खरोखरच पैशाची गरज आहे अशा तरुणांना सहकारी बँकेनी सहकार्य करावे. लोकांच्या सहभागातून सहकार वाढविण्याचा प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सहकारी भात गिरण्या मोडकळीस आल्याचे सांगून ते म्हणाले, या भात गिरण्यांना पुनरुज्जीवित करण्याची गरज आहे. सहकारी तत्वावरील शेतीपुरक व्यवसाय करण्यासाठी शेतीपुरक व्यवसायाची सहकारी संस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे. सहकार चळवळीतून गावातील शेतकरी समृध्द होईल. कर्जमाफीसाठी राज्यातील 77 लाख खातेदारांनी ऑनलाईन अर्ज भरले आहे. कोणताही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती करण्याची आज गरज आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबध्द आहे असेही त्यांनी सांगितले.
श्री.बडोले म्हणाले, राज्यात सहकारी संस्थांचे काम अत्यंत चांगले आहे. सहकारी संस्था भरभराटीला आल्या पाहिजे. यासाठी सहकारी संस्थांच्या समस्यांचे निराकरण करुन संस्थांचे बळकटीकरण करण्याची गरज आहे. जिल्ह्यात साखर कारखाने सुरु करण्याबाबत आत्मचिंतन करण्याची सुध्दा गरज आहे असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीपुरक व्यवसाय केले पाहिजे. जिल्ह्यात सध्या धान पिकावर मोठ्या प्रमाणात तुडतुडा या किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. या किडीवर नियंत्रणासाठी कृषि विभागाशी संपर्क साधून योग्य उपाययोजना केल्या पाहिजेत असे ते म्हणाले.
श्री.चरेगावकर म्हणाले, लोकाभिमुख सहकारी संस्था कशा निर्माण होतील याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जोपर्यंत लोकांचा सहभाग वाढणार नाही तोपर्यंत सहकार क्षेत्र वाढणार नाही. सहकारी संस्थांचे चिंतन करण्याची आज गरज आहे. सहकारी संस्थांचे पुनरुज्जीवन केले तर नक्कीच विदर्भात सहकार चळवळ वाढीस येईल असे त्यांनी सांगितले.
डॉ.तापकीर म्हणाले, सहकार परिषद समृध्द करण्यासाठी सर्वांनी हातभार लावण्याची गरज आहे. सर्वांच्याच सहकार्यातून सहकार परिषद मजबूत होण्यास मदत होणार आहे असे त्यांनी सांगितले.
आमदार बोंडे म्हणाले, पंडीत दिनदयाल उपाध्याय म्हणत होते की, प्रत्येक शेतकऱ्याच्या हाताला काम असल्याशिवाय शेतकऱ्याचा उध्दार होणार नाही. शेतकऱ्यांचा सहकाराशिवाय उध्दार होणार नाही. सहकारातील चांगल्या प्रवृत्तीला प्रोत्साहन दिले पाहिजे. विदर्भातील सहकार परिषदेला पुनर्जिवीत केले तर निश्चितच सहकार चळवळीला चांगले दिवस येतील असे सांगितले. सहकार चळवळ बळकट व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असेही ते म्हणाले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सहकार चळवळ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हा उपनिबंधक संदिप जाधव, सहकारी संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, तसेच सर्व सभासद व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष सुभाष आकरे यांनी केले. संचालन मजूर सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष दिपक कदम यांनी केले, तर उपस्थितांचे आभार रेखलाल टेंभरे यांनी मानले.