जिल्हा परिषदेच्या 493 शाळा डीजीटल – विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानावर आधारीत शिक्षणाचे धडे

0
609
Google search engine
Google search engine

यवतमाळ- :

सध्याचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे युग आहे. गत दोन दशकांपासून शिक्षण क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. शहरी भागात प्राथमिक शिक्षणपासून ते उच्च शिक्षणापर्यंत अनेक शाळांचा/ महाविद्यालयांचा पर्याय उपलब्ध असतो. मात्र ग्रामीण भागात जास्तीत जास्त शाळा या जिल्हा परिषदेच्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीसुध्दा स्पर्धेत टिकावा. माहिती व तंत्रज्ञानाची त्याला ओळख व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग कार्य करीत आहे. जिल्हा परिषदेच्या 493 शाळांमध्ये डीजीटल वर्गखोल्या चालविण्यात येत असून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाचे धडे मिळत आहे.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक मुल शिक्षणाच्या प्रवाहात यावा. उद्याचा जबाबदार नागरिक होण्यासाठी तो सक्षमपणे शिकावा. तसेच आजच्या युगात माहिती व तंत्रज्ञान आधारीत शिक्षण प्राथमिक स्तरापासूनच देणे गरजेचे आहे, या उद्देशाने प्राथमिक शाळांमध्ये डीजीटल वर्गखोल्यांची संकल्पना मांडण्यात आली. यासाठी शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या. या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये डीजीटल वर्गखोल्यांची निर्मिती करण्यात आली.
जिल्ह्यात सद्यस्थितीत 493 जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये डीजीटल वर्गखोल्या कार्यरत असून यात यात 192 शाळांमधील वर्गखोल्या लोकसहभागातून निर्माण करण्यात आल्या. 153 शाळा ई-वर्ग जमीन फंडातून, 45 शाळा ई-वर्ग व लोकसहभाग मिळून, 58 शाळा सर्व शिक्षा अभियानातून, 38 शाळा पेसा अंतर्गत फंडातून, 3 शाळा सीएसआर फंडातून आणि 4 शाळा चाईल्ड फ्रेंडली उपक्रमातून डीजीटल करण्यात आल्या आहेत. या वर्गखोल्यांमध्ये संगणक, प्रोजेक्टर, इंटरनेट आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे त्या माध्यमातून हसत-खेळत व चलचित्र बघत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकविला जातो.
डीजीटल वर्गखोली करण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर असलेली शिक्षण समिती आलेल्या प्रस्तावाला मान्यता देते. तर ग्रामस्तरावर असलेल्या शाळा व्यवस्थापन समितीद्वारे लोकसहभागातून त्यावर देखरेख ठेवली जाते. या व्यवस्थापन समितीत 75 टक्के पालकांचा समावेश असतो. त्यातही या 75 टक्क्यांमध्ये 50 टक्के महिला पालक असणे आवश्यक आहे. उर्वरीत 25 टक्क्यांमध्ये ग्रामपंचायत सदस्य, शिक्षणप्रेमी, शिक्षक आणि 2 विद्यार्थ्यांचा समावेश असतो.
डीजीटल अंगणवाडी : जिल्हा परिषदेच्या शाळांसोबत आता अंगणवाड्यासुध्दा डीजीटल करण्यावर राज्य शासन भर देत आहे. या अंतर्गत मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील अंगणवाडी ही जिल्ह्यातील पहिली डीजीटल अंगणवाडी झाली आहे. गावातून लोकवर्गणी गोळा करून तसेच ग्रामपंचायतीच्या 14 व्या वित्त आयोगातून मदत घेत ही डीजीटल अंगणवाडी साकारण्यात आली आहे.