चिंतामणी देवस्थान परिसरात लवकरच सोयीसुविधा युक्त भक्तनिवास – पालकमंत्री मदन येरावार

0
749
Google search engine
Google search engine

यवतमाळ-

 

कळंब येथील चिंतामणी देवस्थानामुळे हे ठिकाण संपूर्ण राज्यात प्रसिध्द आहे. सुखकर्ता, विघ्नहर्ता चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी राज्यातील सर्वच भागातून मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात. येथे येणारे भाविक या ठिकाणी थांबले पाहिजे, यासाठी चिंतामणी देवस्थान परिसरात लवकरच सर्व सोयीसुविधा युक्त भक्तनिवास उभारले जाईल, असे प्रतिपादन पर्यटन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
कळंब येथील चिंतामणी देवस्थान परिसरात विविध विकास कामांचे भुमिपूजन करतांना ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी राळेगावचे आमदार डॉ. अशोक उईके, जि.प. शिक्षण सभापती नंदिनी दरणे, कळंबचे नगराध्यक्ष दिगांबर मस्के, उपाध्यक्ष मनोज काळे, माजी. जि.प.अध्यक्ष प्रवीण देशमुख, चिंतामणी देवस्थान समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर चांदोरे, रूपेश राऊत, बाबुपाटील वानखेडे आदी उपस्थित होते.
संबंधित कामाची निविदा काढल्याशिवाय भुमिपूजन करीत नाही, असे सांगून पालकमंत्री येरावार म्हणाले, येथील भक्तनिवास भाविकांच्या सेवेत 9 महिन्यात उभे करण्याचे नियोजन आहे. चिंतामणी देवस्थान परिसरात 5 कोटी रुपये खर्च करून विकास कामे करण्यात येणार आहे. या कामांचे भुमिपूजन करण्याची संधी मला मिळाली, हा चिंतामणीचा प्रसाद आहे. येथे भक्तनिवास, भोजनकक्ष, पिण्याच्या पाण्याची सोय सर्व सोयी उपलब्ध होणार आहे. कळंबसाठी वैशिष्टपूर्ण योजनेतून 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नागरिकांच्या मुलभूत गरजा आणि सुविधा पूर्ण करण्यावर सरकारचा भर आहे. विकासाच्या दिशेने आपला प्रवास सुरू आहे. केंद्र आणि राज्यात विकास करणारे सरकार आहे. गतिमानता, पारदर्शकता आदी बाबीला सरकारचे प्राधान्य आहे. येथील पाणी पुरवठ्यासाठी लवकरच निधी देण्यात येईल. बेंबळा प्रकल्पामुळे राळेगाव, कळंब, झरीजामणी आदी शेतक-यांना फायदा होणार आहे. तसेच नागरिकांना पिण्याचे पाणीसुध्दा उपलब्ध होईल. ठराविक कालावधीत कामे पूर्ण करण्यावर आपला भर आहे. शेवटच्या माणसाच्या विकासासाठी हे सरकार कटिबध्द आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार डॉ. अशोक उईके म्हणाले, या परिसराचा विकास झाला पाहिजे, अशी तालुकावासियांची मागणी होती. आज विकास कामांसाठी तसेच भक्तनिवासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी कळंब वासियांच्या वतीने पालकमंत्र्यांचे आभार मानतो. यावेळी आर्किटेक्चर विनय बावधणे, प्रशांत सवई यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
राज्य शासनाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत कळंब येथील चिंतामणी देवस्थान परिसरात पर्यटन विकासासाठी 4 कोटी 96 लक्ष 90 हजार रुपयांच्या निधीस मान्यता दिली असून 50 लक्ष रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. या अंतर्गत उपहारगृह,पदपथ, भक्तनिवास, अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण आदी सुविधा उभारण्यात येणार आहे. हे कामाचे कंत्राट अमरावती येथील एस.एम. अग्रवाल यांना देण्यात आले असून सदर काम एप्रिल 2018 अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
तत्पूर्वी पालकमंत्री मदन येरावार आणि आमदार डॉ. अशोक उईके यांनी चिंतामणी देवस्थानात दर्शन घेतले. तसेच महारुद्र हनुमान मंदिरात प्रतिमेचे पुजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवस्थान समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर चांदोर यांनी तर संचालन प्रा. अतुल सारडे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.