स्थानिक खनिजातून स्थानिकांना रोजगारासह संपन्नता – मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस

0
820
Google search engine
Google search engine
लॉयडस् स्टील प्रकल्पासाठी जमीन हस्तातणसह शुभारंभ
कोनसरी –

स्थानिक खनीज संपत्ती ही स्थानिकांच्या संपन्नतेसाठी वापरली जावी अशी आमची भूमिका आरंभापासून राहिलेली आहे. यातून रोजगारही स्थानिकांनाच मिळाल पाहिजे हा आग्रह आम्ही धरलेला आहे. याच भूमिकेतून हा लॉयड्सचा लोह प्रकल्प येत आहे. ही गडचिरोलीसाठी ऐतिहासिक अशी घटना ठरणार आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
गडचिरोली जिल्हयातील चामोर्शी तालुक्यात असलेला कोनसरी येथे वाटाघाटीद्वारे शेतकऱ्यांनी या लोहप्रकल्पाला दिलेला जमीनीचे हस्तांतरण आणि ज्यांनी जमीन दिली त्यांना धनादेश प्रदान करुन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते.
स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी आलापल्ली येथील आय टी आय मध्ये कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी लॉयडस् स्टील ॲन्ड एनर्जीने आय टी आय दत्तक घेतले असल्याचीही घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
सिंचन विहिरींच्या धनादेशाचेही प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना वाटप केले. या लोह प्रकल्पाच्या शुभारंभ कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गडचिरोलीचे पालकमंत्री ना.राजे अम्ब्रीशराव आत्राम, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, खासदार अशोक नेते, आमदार मितेश भांगडिया, आमदार देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे, लॉयड मेटल्सचे अतुल खाडीलकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी ए.एस.आर.नायक आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
तरुणांना हातात बंदुका नकोत, त्यांना विकास हवा असतो. त्यामुळे उद्योग आला की विकास येतो, संपन्नता येते. माझ्या सरकारने गडचिरोलीचा विकास करण्याचे आश्वासन दिले होते. लॉयड्स स्टील उद्योगाच्या शुभारंभाने ते पूर्ण होत असून कोणत्याही परिस्थितीत केवळ गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांनाच या ठिकाणी रोजगार मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
गडचिरोली जिल्हयातील चार्मोशी तालुक्यातील कोनसरी येथे लॉयड्स मेटल्स ॲन्ड एनर्जी लिमिटेडच्या लोह प्रकल्पाचा शुभारंभ आज त्यांच्या हस्ते झाला. 800 कोटी रुपयांच्या या उद्योगातून किमान 1 हजार स्थानिक युवकांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. जिल्हयातील सूरजगड येथील खाणीतून निघणाऱ्या लोहखनीजावर या ठिकाणी प्रक्रीया करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी जमीनी देणाऱ्या शेतकऱ्यांनी स्वयंप्रेरणेने पुढे येत जिल्हयाला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी जमीनी दिल्या आहेत असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
देश स्वतंत्र झाल्यापासून खनिज संपत्तीने परिपूर्ण असणारा गडचिरोली जिल्हा केवळ काही लोकांच्या विरोधामुळे औद्योगिकीकरणापासून दूर राहीला. आमचे सरकार आल्यापासून सतत गडचिरोलीच्या विकासाचा ध्यास आम्ही घेतला आहे. शेतकऱ्यांना एकीकडे सिंचन विहिरी, विद्युत पंप, वीज पुरवठा उपलब्ध करुन देणे सुरु असून दुसरीकडे गडचिरोली-चंद्रपूर जिल्हयात बांबूवर आधारीत विकास प्रकल्प आम्ही उभारले आहे. जंगलातील मोहफूल व अन्य संपदांवर प्रक्रीया उद्योग सुरु होणार आहे. यावरील वाहतूक निर्बंध काढून टाकले आहेत. आमची स्पष्ट नीती आहे, येथील वनसंपदेचा येथील स्थानिकांना रोजगारासाठी उपयोग झाला पाहीजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
गडचिरोली जिल्हयाची वनसंपदा, खनीजसंपदा विपुल आहे. मात्र यावर सुरू होणारे उद्योग आणि त्यासाठी येणाऱ्या लोकांच्या वसाहती यापुढे निर्माण होऊ देणार नाही. वनसंपदा येथील वापरायची असेल तर रोजगारही आता स्थानिकांनाच मिळेल, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
वडसा देसाईगंज ते गडचिरोली हा रेल्वे मार्ग वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार स्वतः जमीन अधिग्रहण व अन्य बाबींसाठी पुढाकार घेत आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूममधील प्रकल्पात पाठपुराव्यासाठी या लोहमार्गाचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी हा प्रकल्प आता गडचिरोली पर्यंतच मर्यादीत राहणार नसून हैदराबादला जोडला जाणार असल्याची खुषखबरही त्यांनी उपस्थितांना दिली. लॉयड मेटल्स प्रकल्पासाठी पुढे येऊन जमीनी देणाऱ्या शेतकऱ्यांचे व या प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचे यावेळी त्यांनी जाहीर कौतुक केले.
कोनसरी येथे होणार असलेला या प्रकल्पाने सुरजागड येथून झालेले उत्खनन जिल्हयातच प्रक्रिया करण्यासाठी व्यवस्था होत आहे. हा प्रकल्प जिल्हयात व्हावा अशी मागणी स्थानिकांनी केली होती.
हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यावर गडचिरोली जिल्हयात साधारण 5000 जणांना रोजगार प्राप्त होईल. जिल्यात कोणताही मोठा औधोगिक प्रकल्प नव्हता. त्यामुळे आदिवासी बहूल अशा या दुर्गम असणाऱ्या जिल्यात औद्योगिक क्रांती ची मूहूर्तमेढ या निमित्ताने रोखली गेली असे सर्वानी यावेळी बोलून दाखविले.
या ठिकाणी सूरजगड येथे उत्खनन करण्यात आलेला लोह खनिजावर प्रक्रिया केली जाईल. सध्या आघाडीच्या कार उत्पादकांना ज्या उत्पादनाची गरज असते असे सर्वोत्तम प्रक्रिया केलेले लोह खनिज केवळ गडचिरोलीत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात दळण-वळण व्यवस्था वाढल्यानंतर या जिल्हयात कार उत्पादक देखील आपले प्रकल्प सुरु करु शकतात असे चित्र आहे.
या प्रक्ल्पासाठी भूसंपादनाचे काम करण्यास साधारण अडीच ते तीन वर्षे कालावधी लागला असता मात्र सरकारच्या सकारात्मक धोरणाने सर्व शेतकऱ्यांनी वाटाघाटीतून जमिन दिली आणि कोनसरीत या लोह प्रक्रिया प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला.