जबलपूर नजिकच्या अपघातातील मृतकांच्या वारसांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वितरण व सांत्वन

0
550
Google search engine
Google search engine

● मृतकाच्या वारसाला प्रत्येकी 1 लक्ष मदत 

● जखमींना 25 हजाराची मदत
● मध्यप्रदेश कृषी मंत्र्यांकडून मदतीचा हात

गोंदिया -मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या सडक/अर्जुनी तालुक्यातील पळसगाव, बोथली, घाटबोरी/कोहळी व सिंदीपार येथील 11 मजुरांचा जबलपूरपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या जमुनिया जवळील नाल्यावर त्यांना घेवून जाणाऱ्या वाहनाला अपघात होवून 10 मे च्या पहाटे मृत्यू झाला.
पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आज 12 मे रोजी सर्व मृतकांच्या परिवाराला भेट देवून त्यांचे सांत्वन केले व मृतकांच्या वारसांना ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रत्येकी 1 लक्ष रुपये व जखमींना प्रत्येकी 25 हजार रुपये धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी मध्यप्रदेशचे कृषी मंत्री गौरीशंकर बिसेन यांच्या वतीने देखील मृतकांच्या परिवाला प्रत्येकी 1 लक्ष रुपये व जखमींना प्रत्येकी 25 हजार रुपये धनादेश वाटप करण्यात आले.
यावेळी बालाघाटच्या जिल्हा परिषद अध्यक्ष रेखाताई गौरीशंकर बिसेन, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, सडक/अर्जुनी पं.स.सभापती कविता रंगारी, जि.प.सदस्य माधुरी पाथोडे, शिला चव्हाण, पं.स.सदस्य राजेश कठाणे, तालुका भाजपा अध्यक्ष विजय बिसेन, डॉ.भुमेश्वर पटले, गोंदिया न.प.उपाध्यक्ष शिव शर्मा, नगरसेवक भरत क्षत्रीय, श्री.ठाकुर, पळसगावच्या सरपंच मंजूळाबाई पराते, बोथलीच्या सरपंच गीता चव्हाण, घाटबोरीच्या सरपंच सुकेशिनी नागदेवे, सिंदीपारच्या सरपंच जसवंत टेकाम, पळसगावचे उपसरपंच मुकेश सिंघल, तहसिलदार विठ्ठल परळीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, ठाणेदार केशव वाभळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले यावेळी म्हणाले, अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटूंबाचा आधार गेला आहे. त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी असून या कुटुंबाना यापुढेही आमचे सहकार्याचीच भूमिका राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीमती बिसेन म्हणाल्या, सडक/अर्जुनी तालुक्यातील मृतक मजूर रोजगारासाठी मध्यप्रदेशात आले होते. परंतू काळाने त्यांच्यावर घाला घातला. आमच्या राज्यात ही घटना झाल्यामुळे आम्ही मदत करणे हे आमचे कर्तव्य समजतो. सर्व कुटुंबांना दु:ख सहन करण्याची शक्ती इश्वर देवो असे त्या म्हणाल्या.
जिल्हाधिकारी काळे म्हणाले, काळ हा सांगून येत नाही. ज्या कुटुंबावर हा आघात झाला त्या कुटुंबांना मदत करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. या कुटुंबाबद्दल शासनाची सहानुभूती असून निश्चितच या कुटुंबाच्या पाठीशी प्रशासन उभे राहील. जे व्यक्ती अपघातात जखमी होवून जबलपूर येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यांना देखील मदत करण्यात येईल. त्यांच्यावर चांगल्याप्रकारे उपचार झाले पाहिजे यासाठी तेथील आरोग्य प्रशासनाशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मृतकाच्या वारसदार ललिता भोयर, पंचफुला शेंडे, माधुरी मरस्कोल्हे, इंदिरा दखणे, मिराबाई कांबळे, भाऊराव राऊत, पुष्पा राऊत, गीता चौधरी, जायत्रा श्रोते, सरीता भोयर, अरुणा चौधरी यांना प्रत्येकी 1 लक्ष रुपयाचा धनादेश तसेच जखमी रविंद्र दखणे, चुन्नीलाल शेंडे, त्रिमुर्ती बन्सोड, निलेश्वर सोनवणे, भाऊराव राऊत यांना प्रत्येकी 25 हजार रुपयाचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.