स्वतःच्या शीलरक्षणासाठी ‘जोहार’ करणार्‍या राणी पद्मावतीला नाचतांना दाखवणे खपवून घेणार नाही ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

0
993
Google search engine
Google search engine

मुंबई – प्राचीन काळी हिंदु परिवारातील कुलीन महिला या समाजापुढे नाचगाणे करत नव्हत्या, तर त्या वीरांगणा प्रसंगी हातात समशेर घेऊन मोगलांना नाचायला लावणार्‍या होत्या, असा इतिहास असतांना त्यात मोडतोड करून संजय लीला भन्साळी यांनी ‘पद्मावती’ चित्रपटातील ‘घूमर’ या गाण्यात राणी पद्मावतीला नाचतांना दाखवले आहे. यापूर्वीही ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटात त्यांनी बाजीरावांची पत्नी काशीबाई यांनाही नाचतांना दाखवले होते. हा हिंदु वीरांगणांचा अपमान असून, तो हिंदु समाज कधीही सहन करणार नाही, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

श्री. रमेश शिंदे यांनी या पत्रकात म्हटले आहे की,

१. स्वतःच्या मनाप्रमाणे इतिहासाची मोडतोड करून मसालेदार चित्रपट बनवून त्यातून कोट्यवधी रुपये कमवणार्‍या दिग्दर्शकांना कला आणि अभिव्यक्ती यांचे स्वातंत्र्य लागू होत नाही.

२. ‘घूमर’ हा नाच राजस्थानी संस्कृतीतील एक नृत्यप्रकार आहे आणि तो नाच करणारा एक विशिष्ट समाज आहे. हा नाच कोणत्याही राजकन्या वा राण्या करत नव्हत्या, हे इतिहासाच्या आधारे चित्रपट बनवणार्‍या भन्साळींना का माहिती नाही?

३. आजकाल बॉलीवूडमध्ये गुंड आणि राजकारणी यांच्यासमोरही ‘आयटम साँग’मध्ये नाच करण्यासाठी अन्य ‘आयटम गर्ल’ आणल्या जातात. मग येथे ‘घूमर’ नाचच दाखवायचा होता, तर भन्साळी तेथे अन्य कोणीही कलाकार नाचतांना दाखवू शकले असते, तेथे राणी पद्मावतीला नाचतांना दाखवण्याचे प्रयोजन काय ?

४. ज्या राणीने स्वतःच्या शीलरक्षणासाठी ‘जोहार’ (जिवंतपणी अग्नीत प्रवेश) केला, अशा सत्शील राणीला नाचतांना दाखवणे, हा राणी पद्मावतीचा घोर अपमान आहे. याविषयी भन्साळी यांनी हिंदु समाजाची जाहीर क्षमा मागावी आणि राणी पद्मावतीने नाच केलेले काल्पनिक गाणे चित्रपटातून वगळावे.

५. संजय लीला भन्साळी यांना महिला, माता यांच्याविषयी आदर आहे; म्हणून ते वडिलांच्या जागी आईचे नाव लावतात. तर मग राणी पद्मावतीकडे माता म्हणून पहाणार्‍या हिंदु समाजाच्या आदरयुक्त भावना त्यांना समजू नयेत, हे दुर्दैव आहे. वाद निर्माण करून गल्ला भरायचा, हा आता या निर्मात्यांचा धंदा झाला आहे, हेच यातून सिद्ध होते.