राज्यातील प्रत्येक जिल्हा उद्योग केंद्रीत असावा : केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु

0
602
Google search engine
Google search engine

नवी दिल्ली –

 

राज्यातील प्रत्येक जिल्हा उद्योग केंद्रित असावा यासाठी केंद्र शासन प्रयत्नरत असून महाराष्ट्राने यादिशेन पाऊले उचलली आहेत असे, प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभु यांनी आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयात महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन करतांना केले.

प्रगती मैदान येथे दि.१४ ते २७ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे आयोजन करण्यात आले असून 15 क्रमांकाच्या हँगरमध्ये महाराष्ट्राचे दालन उभारण्यात आलेले आहे. या दालनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री श्री प्रभु यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत, याप्रसंगी केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सी.आर चौधरी, राज्याचे उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजी दौंड आणि उद्योग विभागाचे विकास आयुक्त हर्षदिप कांबळे, आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयाचे मुख्य व्यवस्थापकिय संचालक श्री गोयल उपस्थित होते.

महाराष्ट्र देशातील एक पुढारलेले राज्य असून महाराष्ट्राने उद्योग क्षेत्रात बरीच उंच भरारी घेतली आहे. हा विकास काही मोठया महानगरातच झाल्याचे दिसून येते. हा विकास चौफेर व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रीया श्री. प्रभु यांनी यावेळी व्यक्त केली.
‘मेक इन इंडिया’ या संकल्पनेवर आधारीत आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात महाराष्ट्राला भागीदार राज्य बनविले होते. या प्रदर्शनात महाराष्ट्रामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय उद्योजकांनी गुंतवणूक करण्यास ईच्छा दर्शवीली होती. मुख्यमंत्र्याशी झालेल्या चर्चेनुसार कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या चारही ठिकाणी औद्योगीकरण राबवायचे आहे. या ठिकाणांच्या भौगोलिक परिस्थितीनुसार उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येईल. फार्चुनमध्ये जाहीर झालेल्या 500 कंपन्यांच्या मुख्यकार्यकारी अधिका-यांशी व्यक्तीगत पातळीवर हॉटलाईनच्या माध्यमातून चर्चा सुरू केलेली आहे, अशी माहिती श्री प्रभु यांनी यावेळी दिली.
कोकण विभागाचा पाहिजे तसा औद्योगिक विकास झालेला नसुन येथेही उद्योग उभारणीचे प्रयत्न सुरू असल्याचे श्री प्रभु यावेळी म्हणाले. महाराष्ट्राचा सर्वांगीण औद्योगिक विकास होणे गरजेचे असून विकास कसा होईल याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे श्री प्रभु म्हणाले. महाराष्ट्राला 720 किलोमिटरचा समुद्री किनारा लाभाला असून येथे किनारी निर्यात क्षेत्र (कोस्टल एक्सपोर्ट झोन) उभारता येतील याचेही प्रयत्न सुरू असल्याचे श्री प्रभुंनी सांगितले.