समाज माध्यमासमोर विश्वासार्हतेचे मोठे आव्हान – पत्रकार दिनाच्या चर्चेतील सूर – जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिन साजरा

0
649
Google search engine
Google search engine

भंडारा :-

स्वातंत्र मिळविण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या पत्रकारीता क्षेत्रातही कालानुरुप आमुलाग्र बदल झाला आहे. या बदलामध्ये सर्वात मोठा बदल हा समाज माध्यमांनी घडवून आणला असून मोबाईल व इंटरनेट क्रांतीमुळे प्रत्येक व्यक्तींच्या हातात स्वतंत्र माध्यम आले आहे. समाज माध्यमासमोर विश्वासार्हतेचे मोठे आव्हान असून या माध्यमाचा उपयोग सामान्य माणसाच्या हितासाठी झाल्यास समाज माध्यम अधिक प्रभावी ठरेल, असा सूर माध्यमासमोरील आव्हाने या विषयावरील चर्चेत उमटला.
राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्ताने जिल्हा माहिती कार्यालय भंडारा येथे “ माध्यमासमोरील आव्हाने” या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात उपस्थित अधिकारी व पत्रकार यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, माजी जिल्हा माहिती अधिकारी सदानंद मोहतुरे, पत्रकार दिपक फुलबांधे, नरेश बोपचे, काशिनाथ ढोमणे, विजय निचकवडे, दिपेंद्र गोस्वामी, तथागत मेश्राम, राजू मस्के, श्रीकांत पनकंटीवार, अजय मेश्राम, दिपक रोहणकर, प्रल्हाद हुमणे, ललितकुमार बाच्छिल, दिपक केसरकर, संघर्ष शेंडे, सि.एच. अजयकुमार, जिल्हा माहिती कार्यालयातील सुनिलदत्त जांभूळे, घनश्याम खडसे, बंडूसिंग राठोड, विजय डेहनकर, सुनिल फुलसुंगे, घनश्याम सपाटे, रेखाबाई निनावे उपस्थित होते.
जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित या छोटेखानी कार्यक्रमात माध्यमासमोरील आव्हाने या विषयावर उपस्थित पत्रकारांनी चर्चा केली. माध्यमासमोर सद्या समाज माध्यमाचे मोठे आव्हान उभे आहे. समाज माध्यमात प्रसारित होणाऱ्या बातम्या व व्हिडीओ बाबत सत्यता पडताळणे अत्यंत जिकरीचे झाले आहे. त्याच प्रमाणे सामाजिक समस्या व ग्रामीण भागातील प्रश्न यांना माध्यमात मोठया प्रमाणात जागा देणे आवश्यक असल्याचे मत या चर्चेत मांडण्यात आले. वेब मिडीया हे नवे व्यासपिठ समाजमाध्यमात निर्माण झाले आहे. अनेक सोशल साईटवर चॅनल आपले स्वत:चे चॅनल बनविण्याचे सुविधा प्राप्त झाल्यामुळे वेब मिडीयाची व्याप्ती वाढली आहे. विशेष म्हणजे समाज माध्यमातून प्राप्त झालेल्या संदेशाची खातरजमा न करता तशाच्या तशाच इतरांना फॉरवर्ड करण्याची वृत्ती सुध्दा माध्यमासमोर मोठे आव्हान म्हणून उभे ठाकले आहे.
अशा विविध माध्यमाचा विचार केला असता माध्यमासमोरील सर्वात मोठे आव्हान विश्वासार्हतेचे आहे. समाज माध्यमात प्रसारित होणाऱ्या वृत्तांवर कितपत विश्वास ठेवावा हा प्रश्न असल्याचा सूर या चर्चेत उमटला. मुद्रीत आणि ईलेक्ट्रानिक्स माध्यमातील पत्रकारीता अधिक जबाबदारीची झाली आहे. समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे सामान्य माणसाला आपले विचार व्यक्त करण्याचे व्यासपिठ मिळाले असले तरी या माध्यमाचा वापर बऱ्याच वेळा सकारात्मक होतांना दिसत नसल्याची खंतही या चर्चेत मांडण्यात आली. एकेकाळी स्वातंत्र मिळविण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या पत्रकारीता क्षेत्रातही कालानुरुप आमुलाग्र बदल झाला आहे. या बदलामध्ये सर्वात मोठा बदल हा समाज माध्यमांनी घडवून आणला आहे. मोबाईल क्रांतीमुळे प्रत्येक व्यक्तींच्या हातात स्वतंत्र माध्यम आले आहे. या माध्यमाचा उपयोग सामान्य माणसाच्या हितासाठी झाल्यास समाज माध्यम अधिक प्रभावी ठरेल, असा सूरही या चर्चेत उमटला.