घोटण (ता. शेवगाव, अहमदनगर) गोळीबाराची उच्चस्तरीय चौकशी करावी : प्रीती मेनन ( आप राष्ट्रीय प्रवक्त्या )

0
859
Google search engine
Google search engine

उसाला टनामागे एकरकमी 3100 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांवर पोलीसांनी केलेल्या गोळीबाराची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि नगरच्या पोलीस अधिक्षकांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन यांनी केली आहे.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचे सांगली आणि घोटण (ता. शेवगाव) प्रकरणातून स्पष्ट होत आहे. ऊस दरवाढीच्या मागणीसाठी सुरू आंदोलन बळजबरीने दडपण्यासाठी पोलीसांनी केलेल्या गोळीबारात दोन शेतकरी तसेच काही महिला जखमी झाल्या आहेत. स्थानिक प्रशासनाला आणि पोलीसांना हे प्रकरण हाताळण्यात अपयश आल्यामुळेच शीघ्र कृतिदलास पाचारण करावे लागले. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
देवेंद्र फडणवीस यांचे सरकार शेतकऱ्यांच्या वैफल्याची आणि संयमाची परीक्षा घेत आहे. स्वत:ला शेतकऱ्यांचे नेते म्हणवणारे काही लोक शेतकऱ्यांना हिंसेसाठी भडकावत आहेत. ही लाजिरवाणी बाब आहे.
“आप” चे सर्व शेतकऱ्यांना आवाहन आहे की, त्यांनी या शेतकरी विरोधी सरकारचा निषेध शांततेने करावा कारण हिंसक आंदोलनाचे दुष्परिणाम केवळ गरीब शेतकऱ्यांनाच भोगवे लागतात. मात्र अशा आंदोलनाचे सारे श्रेय असे कथीत शेतकरी नेतेच लाटतात.
सरकारला जनतेच्या प्रश्‍नांचे गांभीर्यच कळत नाही. कर्जमाफीच्या नावखाली घोर फसवणूक केल्यानंतर आता सरकार उसाला दरवाढ मागणाऱ्या शेतकऱ्यांनाच गोळ्या घालू लागले आहे. हा या सरकारचा नाकर्तेपणा आहे.
विरोधी पक्षात असताना उसाला 3500 रुपये भाव मागणाऱ्यांनीच सत्तेत येताच 3100 रुपये भाव मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला, हे सत्य सहकार मंत्र्यांनी स्वीकारावे आणि याची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा, अशी मागणीही प्रीती मेनन यांनी केली आहे. शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या या सरकारला आगामी निवडणुकांमध्ये शेतकऱीच गाडून टाकतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.