मोठी स्वप्न उराशी बाळगून एकजुटीने मोठे व्हा – खासदार सचिन तेंडुलकर

0
771
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद :/

-.

सचिन….सचिन….सचिन….सचिन…… या आवाजाने अवघे डोंजा गाव दुमदुमले होते. निमित्त होते मास्टर-ब्लास्टर, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची डोंजा गावास आजची भेट. डोंजा ग्रामस्थांनी सचिनच्या स्वागतासाठी प्रत्येक घरावर गुढी उभारली होती, दारात रांगोळया सजल्या होत्या तसेच गावच्या वेशीत भव्य कमान उभारण्यात आली होती.
केंद्र शासनाच्या सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत डोंजा गावाची निवड करण्यात आली, सचिन तेंडुलकर उस्मानाबाद जिल्हयातील परंडा तालुक्यातील दत्तक घेतलेल्या डोंजा गावाच्या दौऱ्यावर आज आले असताना गावकऱ्यांनी मोठी स्वप्न उराशी बाळगून एकजुटीने मोठे व्हा असे प्रतिपादन त्यांनी येथे केले.
या कार्यक्रमातील मुख्य सभेत गावकऱ्यांशी संवाद साधताना श्री. तेंडुलकर यांनी डोंजा ग्रामस्थांना आवाहन केले की, मोठयांचा आदर करावा. मनात चांगले विचार असले की, आपल्याकडून कामेही चांगलीच होतात. मोठयांच्या आशिर्वादाने आपल्याकडून निश्चित चांगली कामे होऊ शकतात त्यामुळे सर्वांनीच आपल्या गावच्या विकासाचे ध्येय ठेऊन एकजुटीने डोंजा गावाची ओळख एक आदर्श गाव म्हणून मिळवण्याचा प्रयत्न करुया असे बोलून त्यांनी समस्त ग्रामस्थांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या योजनेंतर्गत व्यायामशाळा, सौर उर्जा उपकरणांची सुविधा उपलब्ध करुन देणे, भूमिगत गटार व्यवस्थापन, खेळांसाठी मैदानाची उपलब्धता, शौचालयाचे बांधकाम, राजीव गांधी भवनाची निर्मिती, पोल्ट्री फार्म, शेळया मेंढया व जनावरांची तपासणी मोहीम, ठिबक सिंचन संच बसविणे, गावकऱ्यांची आरोग्य तपासणी शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा व संगणक कक्ष स्थापन करणे, आधार नोंदणी, शेतकऱ्यांचे निर्माण, रस्ता डांबरीकरण इत्यादी कामे केली जाणार आहेत. या संपूर्ण विकासकामांसाठी एकूण निधी 8 कोटी 65 लाख 25 हजार रुपये उपलब्ध आहे.
या कार्यक्रमात सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते सायन्स व्हिलेज प्रशिक्षणाकरीता चेन्नई येथे गेलेल्या मुलींना प्रमाणपत्र, प्रौढ साक्षरता प्रमाणपत्र तसेच लोकराज्य बचतगट, लोकराज्य गणेश मंडळ या लोकराज्य पुरस्काराचेही वितरण करण्यात आले त्याचबरोबर बचतगटाच्या 100 महिलांनी अवयवदानाचा संकल्प केल्याबाबत प्रातिनिधीक स्वरुपात डोनर कार्ड देऊन दोन महिलांचा सत्कार करण्यात आला.
केंद्र शासनाच्या सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेतलेल्या गावातील विकासकामांची पाहणी करण्यासाठी ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर मंगळवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील डोंजा (ता. परंडा) येथे आले असताना ग्रामस्थांनी त्यांचे ढोल ताशाच्या तसेच टाळ-मृदुंगाच्या गजरात जंगी स्वागत केले. सचिनच्या आगमनाच्या वेळी डोंजा ग्रामस्थांबरोबरच जिल्ह्यामध्येही उत्सुकता असल्याने संभाव्य गर्दीचा अंदाज घेऊन प्रशासनाबरोबर पोलिसांनीही तयारी करत, कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर मंगळवारी दि. 19 डिसेंबर रोजी सकाळी पुण्यातून हेलिकॉप्टरने डोंजा येथे आला. सकाळी साडेअकरा वाजता डोंजा येथे पोहोचल्यानंतर सर्वप्रथम ते जिल्हा परिषद शाळेतील क्रिकेट ग्राऊंडवर विद्यार्थ्यांसोबत क्रिकेट खेळले आणि शाळेतील विद्यार्थ्यांशी संवादही साधला. नंतर त्यांनी गावातील पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे उदघाटन केले. त्यानंतर गावातील धार्मिक स्थळांना भेट देऊन दर्शनही घेतले.
खासदार निधीतून गावामध्ये सद्यस्थितीत चार कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. यामध्ये शाळा, पाणीपुरवठा योजनेबरोबर रस्त्यांचीही कामे होत आहेत. यातील काही कामांची सुरुवात सचिन तेंडुलकरच्या हस्ते आज झाली तर कामांची सुरुवात झालेल्या काही प्रकल्पांनाही त्यांनी यावेळी भेट दिली. याप्रसंगी सचिन तेंडुलकर यांनी ग्रामस्थांशीही मुक्त संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, भूमचे प्रांताधिकारी स्वप्नील मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सिध्देश्वर धुमाळ, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, औदुंबर उकिरडे, जिल्हा परिषद महिला व बाल विकास अधिकारी श्री. निपाणीकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आघाव, जिल्हा अवयवदान समन्वय अधिकारी डॉ. गजानन परळीकर, जिल्हा क्रिडा अधिकारी संजय महाडीक, तहसिलदार अनिल हेळकर, गट विकास अधिकारी श्री. नलावडे, सरपंच संध्या सुर्यवंशी, प्रख्यात क्रिकेट समालोचक सुनंदन लेले, उदय भालेराव यांची प्रमुख उपस्थिती तसेच समस्त डोंजा ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.