श्री जयंत पाटील धनगराच्या वेषात सभागृहात अवतरून सरकारचे लक्ष वेधले – सरकारने धनगर समाजाची मागणी मान्य केली नाही तर ते हीच काठी हातात घेतील – श्री जयंत पाटील

0
693
Google search engine
Google search engine

नागपूर. ( शाहरुख मुलाणी ) – राज्यातील धनगर समाजाला आरक्षण देण्याचा विसर पडला असून या आरक्षणाची आठवण करुन देण्यासाठी विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी धनगर वेषात विधानभवनामध्ये प्रवेश करुन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाला सरकार विलंब करत असल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी चक्क धनगर वेषात सभागृहामध्ये प्रवेश केला. विधानसभेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच धनगर वेषात कोणी राजकीय नेता सभागृहात दाखल झाला आहे. जयंत पाटील यांचा सभागृहामध्ये धनगर वेषामध्ये प्रवेश होताच त्यांच्या बाजुला उभे राहण्यासाठी आमदार आणि अनेक मातब्बर राजकारण्याची झुंबड उडाली होती. सरकारने पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याचे जाहीर केले होते.मात्र सरकारला या गोष्टीचा विसर पडला आहे. त्यासाठीच सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जयंत पाटील यांनी ही वेशभूषा केली. राज्यातील धनगर समाजाची काठी हे प्रतिक आहे. सरकारने धनगर समाजाची मागणी मान्य केली नाही तर धनगर समाज हीच काठी हातात घेईल असा इशारा जयंत पाटील यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सरकारला वेगवेगळ्या विषयावर जेरीस आणत असून जनतेच्या प्रश्नावर तितकेच आक्रमक होताना दिसत आहेत. विधीमंडळ पक्षनेते अजित पवार आणि गटनेते जयंत पाटील, विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार सुनिल तटकरे हे आणि सर्वच आमदार सरकारला जनतेच्या प्रश्नावर जेरीस आणत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी सरकारच्या नाकीनऊ आणले आहे.