नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात ग्राहक दिन साजरा

0
1004
Google search engine
Google search engine

    नागपूर-: जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आज जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर व भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ग्राहक दिनानिमित्त मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले.

            कार्यक्रमाला पुरवठा विभागाचे उपायुक्त रमेश आडे, अन्न व वितरण अधिकारी प्रशांत काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती उज्ज्चला तेलमासरे, कन्झूमर गाईडस सोसायटी ऑफ इंडियाचे उपसचिव संतोष शुक्ला, सदस्य श्रीमती अनिंदिता कहूर, प्रतीक मिश्रा, श्रीमती स्नेहल आपटे आदी  मान्यवर यावेळी उपस्थित होते.

            मार्गदर्शन करताना संतोष शुक्ला म्हणाले, ग्राहक म्हणजे अशी व्यक्ती जी विशिष्ट मोबदल्यात एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी करते. आजच्या जागतिकिकरणात आणि वाढत्या व्यवसायात ग्राहक हा अतिशय महत्वाचा भाग झाला आहे. यामुळे गुंतवणूक करताना फसवणूक होणार नाही, याची ग्राहकांनी काळजी घ्यावी. आजचा ग्राहक सुजाण असल्याने कुठल्या प्रकारची गुंतवणूक करावी यांचे ज्ञान ग्राहकाला असल्यामुळे फसवणूकीच्या प्रकाराला काही प्रमाणात आळा बसला आहे. दुकानदार ग्राहकाकडून जास्तीचे पैसे घेवून फसवणूक करीत असल्याचे निदर्शनास आल्यास ग्राहकांनी महाराष्ट्र राज्य ग्राहक हेल्पलाईनशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

            यावेळी भारतीय ग्राहक मार्गदर्शक संस्थेव्दारे ग्राहकांना दुध, अन्नपदार्थ यामध्ये असलेली भेसळ, वजनातील फरक, ग्राहकांची फसवणूक झाल्यास तक्रारीचे निराकरण, हुशार गुंतवणूकदार कसे बनावे, दूरसंचार सेवा, बांधकाम व्यवसायाविरुध्द तक्रारी इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती अनिंदिता कहूर यांनी केले तर आभार श्रीमती उज्वला तेलमासरे यांनी मानले.