लेखी आश्वासनाने ‘प्रहार’च्या उपोषणाची सांगता – आमदार बच्चु कडू यांची मंत्रालयीन सचिवांना तंबी

0
756
Google search engine
Google search engine

मोताळा-
शासन व प्रशासनाकडून आपल्या मागण्यांकडे सातत्याने होणाऱ्या दुर्लक्षामुळे प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या कार्यकत्र्यांनी आज २ एप्रिल रोजी सकाळी तहसिल कार्यालयासमोर उपोषणास प्रारंभ केला. आमदार बच्चु कडू यांना ही बाब कळताच त्यांनी मंत्रालय स्तरावरुन सुत्रे हलविले. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या महसुल प्रशासनाने सायंकाळी ६ वाजता दरम्यान उपोषण मंडपाकडे धाव घेत १५ दिवसांत मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे अपंगांनी तुर्तास आपले उपोषण मागे घेतले.
शासननिर्णयानुसार १४ व्या वित्त आयोगाच्या निधीचे अपंगांना वाटप करण्यात यावे, तहसिल कार्यालयात अपंगांसाठी रॅंप व स्वच्छतागृहाचे निर्माण करण्यात यावे, ३ टक्के निधीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका स्तरावर समिती गठीत करण्यात यावी, निवासी भुखंड व व्यापारी गाळे वाटपामध्ये अपंगांना ३ टक्के आरक्षण देण्यात यावे, अपंगांना घरकुल योजनेतून घरकुल देण्यात यावे, श्रावणबाळ व संजय गांधी योजनेच्या केसेस निकाली काढण्यात याव्यात, अपंगांचा अंत्योदय योजनेत समावेश करण्यात यावा, ग्राहक सेवा केंद्रांकडून होणारी हेळसांड थांबविण्यात यावी, अपंगांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी, अशा मागण्या अपंगांच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या. मात्र प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या प्रहार अपंग क्रांतीच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख जयश्री गीते, सुनिल वराडे,तालुका प्रमुख सुरेश जवंजाळ, तालुका उपप्रमुख भगवान लेनेकर, शहरप्रमुख राजेश पुरी, सुधाकर नारखेडे, सुरेश कोसे, निना पाटील व गजानन चोपडे, मोहंमद निसार, ईश्वर मोरे, काशिनाथ भोकरे, रेखा इंगळे, तुळसाबाई खुपराव, सुनिल वराडे यांच्यासह असंख्य कार्यकत्र्यांनी आज २ एप्रिल पासुन तहसिल कार्यालयासमोर उपोषणास प्रारंभ केला होता. दरम्यान आपल्या विविध मागण्यांसाठी अपंगांनी उपोषण सुरु केल्याची बाब प्रहारचे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांनी आमदार बच्चु कडू यांना सांगीतली. सदर बाब गांर्भीयाने घेत आमदार कडू यांनी मंत्रालय स्तरावर संबधित विभागाच्या सचिवांना धारेवर धरुन मागण्या निकाली काढण्याची तंबी दिली. त्यामुळे जिल्हा प्रशासनही खडबडून जागे झाले. तसेच सायंकाळी ६ वाजता मोताळा तहसिलदार डोईफोडे यांनी उपोषण मंडपाकडे धाव घेऊन अपंगांसोबत चर्चा केली. तसेच येत्या १५ दिवसांमध्ये उपरोक्त समस्या मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे अपंगांनी तहसिलदार डोईफोडे यांच्याहस्ते लिंबु पाणी पिऊन तुर्तास उपोषण मागे घेतले. दरम्यान आज दिवसभर विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणास भेट देऊन आपला पांठीबा जाहीर केला होता.