नरखेड तालुक्यात  महाराष्ट्र दिन २४ तास महाश्रमदान करून साजरा – सिने अभिनेता जितेंद्र जोशी यांनी श्रमदान करून वाढविला नागरिकांचा उत्साह

0
863
Google search engine
Google search engine

विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी श्रमदानातून वाढवला गावकऱ्यांचा उत्साह

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा जलसंधारणातून दुष्काळ संपविण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

उमठा, खैरगाव, बरडपवनी यांसह विविध गावांमध्ये झाले महाश्रमदान !

रुपेश वाळके / विशेष प्रतिनिधी /

नरखेड तालुक्यातील अनेक गावांनी पाणी फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येणार्‍या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. या पाणीदार चळवळीची सुरुवात उमठा, खैरगाव, बरडपवनी ह्याप्रमाणेअनेक गावातील ग्रामस्थांनी श्रमदानातून केली आहे. पिण्याच्या, शेतीच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी गावाच्या भौगोलिक परिस्थितीचा लाभ उठवून ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ ही मोहीम एकजुटीने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील नागरिक, महिला, युवक, युवतींनी कामाला प्रारंभ केला असून, यंदाच्या वॉटर कप स्पर्धेत बाजी मारण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. इतकेच नव्हे काल ( ता. १ ) महाराष्ट्र दिन ही तालुक्यात महाश्रमदान करून साजरा देखील केला.

गावात शेतीला शाश्वत पाणी नसल्याने रब्बी, उन्हाळी हंगामात या जमिनीतून उत्पन्न निघत नाही. पिण्याच्या पाण्याची टंचाईही जाणवते. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी गावाच्या सभोवती असणार्‍या उजाड डोंगर रांगाचा, चढ-उतारांचा उपयोग पाणी अडविण्यासाठी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. पाणी फाउंडेशन, गावातील सर्व संस्थाचे पदाधिकारी व नागरिकांच्या सहकार्यातून हे काम तडीस नेण्यात येत आहे. कमी कालावधीत हे सर्व काम पूर्ण केले जाणार असल्याचा विश्वास तालुक्यातील गावकऱ्यांना आहे.

वाढत चाललेली दुष्काळाची दाहकता ओळखून नागपूर जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील असणाऱ्या नरखेड तालुक्यात गावातील लोकांनी आता आपलं गाव पाणीदार करण्यासाठी आपली कंबर कसली आहे. गावकऱ्यांचा हा उत्साह कायम ठेवण्यासाठी सिने अभिनेता जितेंद्र जोशी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही त्याला हातभार लावला आहे. आलिशान इमारतीत बसून केवळ कागदी घोडे नाचवणारे अनेक अधिकारी आपण पाहिले असतील. मात्र ऑफिसच्या बाहेर पडून घामगाळेपर्यंत काम करुण, जनतेच्या हातात हात घालून, लोकांच्या खांद्याला खांदा लाउन काम करणारे अधिकारी पाहायला मिळाले,नरखेड तालुक्यात उमठा येथिल महाश्रमदानामध्ये नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व विभागीय आयुक्त अनुप कुमार, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, अतिरिक्त मुख्य अधिकारी ( नरेगा )पल्लवी तलमले, तहसीलदार जयवंत पाटील,गट विकास अधिकारी शेषराव बुलकुंडे, जि. प. लघु सिंचन विभागाचे नरखेड येथील उपविभागीय अभियंता भूत, तालुका कृषी अधिकारी अजय आटे, वन परिक्षेत्र अधिकारी बोलके, यांनीही श्रमदान केले . सोबतच सर्व अधिकारी व पदाधिकारी यांनीही श्रमदान केले. नरखेड तालुक्यामध्ये विविध जिल्ह्यातील हजारो जलमित्रांनी नोंदणी करून पाणी फाउंडेशनच्या श्रमदान शिबिरात सहभाग घेऊन जनतेसमोर नविन्यापूर्ण आदर्श ठेवत गावकऱ्यांचा उत्साह वाढवला आहे.

दुष्काळ दूर करून गावाला जलयुक्त कराचंय, त्यासाठी स्वत:पासून सुरुवात करायची असा निर्धार प्रत्येकाने करुन पाणी फाऊंडेशनच्या महाश्रमदानाच्या चळवळीत नरखेड तालुक्यातील विविध गावाने आघाडी घेतली आहे. १ मे रोजी झालेल्या महाश्रमदानात हजारो महिला-पुरुषांनी सहभाग घेऊन श्रमदान केले .

‘एकजुटीनं पेटलं…रान…तुफान आलं या….’यासह इतर गीतांच्या ध्वनीफित लावून गावकऱ्यांना प्रोत्साहित करून काही तासांतच हजारो घनमीटर काम झाले. महाश्रमदानासाठी विविध जिल्ह्यातून हजारो जलमित्र नरखेड तालुक्यात महाश्रमदानात सहभागी झाले होते गावातील महिला, पुरुषांसह अबालवृद्धांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. गावातील वयोवृद्ध मंडळी, युवक, युवती, महिला ते लहान मुलांपासून सर्वांनी या महाश्रमदानामध्ये उत्स्फुर्त सहभाग नोंदवून श्रमदान केले. यावेळी लहान मुलांनी देखील न थकता श्रमदान केले.

उमठा येथे रात्री मशाल फेरी काढून पाणी फाउंडेशनचा ध्वज फडकाऊन रात्री १२ वाजता महाश्रमदानाला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. यावेळी सिने अभिनेता जितेंद्र जोशी, पाणी फाउंडेशनचे विदर्भ समन्वयक चिन्मय फुटाणे, धीरज पराशर , तालुका समन्वयक रुपेश वाळके, हेमंत पिकलमुंडे, प्रफुल कोल्हे, सुनील शर्मा यांच्यासह पाणी फाउंडेशन टीम व जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील जलमित्र व्यक्ती व संस्था मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.